आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Search Tharoor Couple Quarrel In Google, Mehra Tarar Said

थरूर दांपत्याचा वाद गुगलवर शोधा, मेहर तरार यांचा खळबळजनक दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - शशी थरूर आणि सुनंदा पुष्कर दांपत्यामध्ये वैवाहिक पातळीवर किती दुरावा निर्माण झाला होता. दोघांमधील वाद काय होता, याचा शोध गुगलवर घ्या. तोपर्यंत मी तर थरूर यांच्या आयुष्यात आलेही नव्हते, असे पाकिस्तानी पत्रकार मेहर तरार यांनी म्हटले आहे. सुनंदा यांच्या गूढ मृत्यूनंतर प्रेमाच्या त्रिकोणाची चर्चा जगभरात होत असतानाच तरारबार्इंनी अशी भूमिका मांडून आपण निर्दोष असल्याचा दावा केला आहे.


सुनंदा यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेल्या वादाच्या केंद्रस्थानी तरार यांच्या नावाची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर तरार यांची भूमिका स्पष्ट झाली आहे. शुक्रवारी त्यांनी ट्विटर अकाउंटवरील आपला फोटो काढून त्या जागी जळणारी मेणबत्तीचा फोटो अपलोड केला. थरूर यांची दोन वेळा भेट झाल्याचे त्यांनी मान्य केले. खरे तर एप्रिलमध्ये भारतात आणि जूनमध्ये दुबईत भेट झाली. त्या वेळी आजूबाजूला खूप लोक उपस्थित होते, असे 45 वर्षीय तरार यांनी शनिवारी रात्री ‘जिओ तेज’शी बोलताना सांगितले. परंतु पाकिस्तानात बसलेली महिला भारतातील विवाह कसा मोडू शकेल. हा सगळा प्रकार माझ्याविरोधात कारस्थानाचा आहे. मी लिहिलेल्या लेखात थरूर यांचा उल्लेख होता. ही गोष्ट सुनंदा यांनी आवडली नाही. थरूर यांच्याबद्दल माझ्या नेहमीच सदिच्छा राहिल्या. परंतु एक स्त्री म्हणून त्यांना हे आवडले नसावे. आमच्यात ट्विटरवरून होणारे संभाषणदेखील त्यांना पटले नाही. म्हणून त्यांनी थरूरला माझ्याशी बोलणे थांबवावे, अशी तंबी दिली होती. परंतु ते (थरूर) मला फॉलो करत होते. मी त्यांच्याशी फोन किंवा इ-मेलवरून संभाषण करण्यात त्यांना काय अडचण होती, हेच मला समजले नाही.


तेव्हा ओळखही नव्हती
तुमच्याकडे गुगल आहे का, असा सवाल तरार यांनी मुलाखत घेणा-या पत्रकाराला विचारला. सुनंदा आणि थरूर यांच्या वैवाहिक आयुष्यात कशा समस्या निर्माण झाल्या होत्या, हे पाहायचे असेल तर गुगल सर्फिंग करा. मे-जूनमध्ये काय घडले होते, त्याचा शोध घ्या. कारण तेव्हा मी थरूर दांपत्याच्या आयुष्यात नव्हते. सुनंदा मला ओळखतही नव्हत्या, ना त्यांचे माझ्यावर काही आरोप होते. त्यांच्या वैवाहिक आयुष्याला तडे गेल्याच्या कितीतरी बातम्या आल्या होत्या, असे तरार यांचे म्हणणे आहे. तरार यांना 13 वर्षांचा मुलगा आहे.


पहिली ठिणगी
तरार यांनी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची मुलाखत घेतली होती. त्याला पुष्कर यांनी आक्षेप घेतला. तसे ट्विटदेखील त्यांनी केले. काश्मीरचे मुख्यमंत्री पाकिस्तानी पत्रकाराला बोलूच कसे शकतात. पाकिस्तानने पहिल्यांदा लष्कर पाठवले. आता पत्रकार पाठवण्यास सुरुवात केली. अशी सुनंदा यांनी माझ्याशी जाहीरपणे भांडणास सुरुवात केली, असे तरार म्हणतात.


आत्महत्या की हत्या, आज स्पष्ट होईल
सुनंदा पुष्कर यांचा पोस्टमॉर्टेमचा अहवाल सोमवारी येऊ शकतो. त्यानंतर सुनंदा यांची आत्महत्या होती की हत्या हे स्पष्ट होणार आहे. त्यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे डॉक्टरांनी अगोदरच म्हटले आहे. त्यांच्या शरीरावर, विशेषत: गळा आणि मनगटावर जखमा दिसून आल्या आहेत. शरीरात विष आढळून आलेले नाही. परंतु मृत्यूचे कारण अल्प्रॅक्सचे अतिसेवन असू शकेल.


थरूर यांचे गृहमंत्र्यांना पत्र,
तपासात सहकार्याची तयारी

पत्नीच्या मृत्यू प्रकरणाच्या तपासात आपण सहकार्य करण्यास तयार आहोत, असे पत्र शशी थरूर यांनी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना पाठवले. प्रसारमाध्यमात आपल्याबद्दल उलटसुलट बातम्या येत असल्याने मी हादरून गेलो आहे. पत्नी सुनंदा हिच्या मृत्यूमागील सत्य जगासमोर यावे, यासाठी अधिका-यांनी तत्काळ तपास करावा. आयुष्यात सुनंदा खूप जवळची होती. परंतु मीडियात अनेक प्रकारचे संशय आणि गूढ व्यक्त केले जात आहे. तपास लवकरात लवकर व्हावा म्हणजे खरे काय ते समोर येईल, अशी अपेक्षा थरूर यांनी पत्रात नमूद केली आहे. पतीचे पाकिस्तानी पत्रकारासोबत अफेअर असल्याचा ट्विटरवरून आरोप केल्याच्या दोन दिवसांनंतर सुनंदा पंचतारांकित हॉटेलमध्ये मृतावस्थेत आढळून आल्या होत्या. दरम्यान, रविवारी शशी थरूर यांचा जबाब नोंदवण्यात आला. रविवारी उपविभागीय दंडाधिकारी आलोक शर्मा यांच्यासमोर त्यांनी आपला जबाब नोंदवला. जबाब नोंदवताना त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. परंतु जेव्हा जबाब देऊन बाहेर पडले, तेव्हा त्यांचे डोळे पाणावलेले होते. एक-दोन दिवसांनंतर त्यांची पुन्हा चौकशी होऊ शकते, असे सांगण्यात आले.