आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुरक्षा रक्षकांनी युवराज अँड्र्यू यांच्यावरच बंदुका रोखल्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - बकिंगहॅम राजवाड्यात गेल्या बुधवारी दोन घुसखोरांना पकडण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा रक्षकांच्या नजरचुकीमुळे काय होऊ शकते याचा अनुभव युवराज अँड्र्यू यांनी घेतला. अँड्र्यू यांना बघताच सुरक्षा रक्षकांनी त्यांना हँड्स अप, असे फर्मान सोडले आणि त्यांच्यावर बंदुकादेखील रोखल्या.


घुसखोरीमुळे राजवाड्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. परवानगीशिवाय चिटपाखरूही या भागात फिरकू नये, याची खबरदारी घेण्यात येत आहे. त्याचा फटका महाराणी एलिझाबेथ यांचे 53 वर्षीय पुत्र अँड्र्यू यांना सुदैवाने बसला नाही, परंतु सुरक्षा रक्षकांना त्यांची ओळख पटली नसती तर हा प्रसंग त्यांच्या जिवावरदेखील बेतला असता. शनिवारची ही घटना. राजवाड्यात सुरक्षा यंत्रणेकडून अचानक झडतीचा कार्यक्रम सुरू झाला. त्याच वेळी अँड्र्यू आपल्या प्रासादिक कक्षातून बाहेर पडले होते. ते उद्यानात निवांतपणे विहार करत होते. पहाटेची वेळ असल्याने उजाडले होते. फिरत असताना अचानक सुरक्षा अधिका-यांचा सामना करावा लागला. दोन सुरक्षा अधिका-यांनी त्यांना अनोळखी व्यक्ती समजून नेहमीच्या सवयीप्रमाणे हात वर करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर दोघांनी त्यांच्यावर बंदुकादेखील रोखल्या. तुम्ही कोणीही असलात तरी आम्हाला त्याच्याशी काही देणे-घेणे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यावर अँड्र्यू यांनी स्वत:चा परिचय करून दिला. तेव्हा त्यांनी आपल्या रोखलेल्या बंदुका बाजूला केल्या, असे राजवाड्यातील सूत्रांनी सांगितले. हा जीवघेणा प्रसंग केवळ अर्धा मिनिटाचा असेल, परंतु त्यातून सुदैवाने अँड्र्यू बचावले. दरम्यान, राजवाड्यातील या दोन घटनांमुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 1982 नंतर पहिल्यांदाच राजवाड्याची सुरक्षा हा गंभीर विषय बनला आहे.