काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूल येथील लष्कराच्या दोन बसवर झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात सात जण ठार झाले. अफगाण सरकार आणि अमेरिकेदरम्यान झालेल्या नव्या लष्करी कराराच्या दुस-याच दिवशी तालिबानने अफगाणच्या लष्करी वाहनांवर निशाणा साधला.
या कराराला तीव्र विरोध असलेल्या तालिबानने बुधवारी सकाळीच झालेल्या या दोन आत्मघातली हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली. या घटनेत सहा जवान आणि एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य १५ जण जखमी झाले. अन्य एका अपघातात चार लष्करी कर्मचारी जखमी झाले. तालिबानचे प्रवक्ते झबिबुल्लाह मुजाहिद यांनी एएफपीला याबाबत इशारा दिला असून ते म्हणाले की, ‘अफगाण सरकारने केलेला हा करार गुलामगिरी पत्करणारा असून आम्ही आमचे हल्ले आणखी सुरूच ठेवणार आहोत.’
अफगाणिस्तान आणि अमेरिकेदरम्यान मंगळवारी दीर्घकाळ प्रलंबित द्विपक्षीय संरक्षण करार झाला. त्यानुसार अमेरिकेचे १० हजार सैन्य पुढील वर्षी अफगाणिस्तानात तैनात असेल. अफगाणिस्तानचे नवनियुक्त राष्ट्रपती अश्रफ घनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी हा करार केला, तर माजी राष्ट्रपती हमीद करझई यांनी हा करार करण्यास नकार दिला होता.