इस्लामाबाद- भारतामुळेच आमचे लष्कर दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करू शकत नाही, असा आरोप पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल राहील शरीफ यांनी केला आहे.
भारत नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कर आदिवासी भागात दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करू शकत नाही, असे त्यांनी म्हटले आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘द डॉन’ने बीबीसी उर्दूच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. जनरल राहिल शरीफ सध्या अमेरिकेच्या दाैऱ्यावर गेले आहेत.
ते म्हणाले की, आदिवासी भागात लष्कर तैनात करायचे होते. याबाबत आमची भारताशी चर्चा झाली होती. पूर्वेकडील सीमेवर हालचाल करणार नाही, असे आश्वासन भारताने दिले होते. त्यामुळे पाकिस्तानने १.४० लाख सैनिक आदिवासी भागात तैनात केले. मात्र भारताने आश्वासन तोडले. भारत सीमेवर जबरदस्त गोळीबार करत आहे. तेथील नेत्यांच्या वक्तव्यांमुळे पाकिस्तानचे नुकसान होत आहे.