आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shashikant Sawant Article About World's Philosopher

एका दार्शनिकाचे तत्त्वविश्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिद्दू कृष्णमूर्ती यांचा जन्म 1895चा आणि ते 90 वर्षे जगले. त्यांच्या आयुष्यात त्यांनी स्वत:चे असे एक तत्त्वज्ञान मांडले. हे तत्त्वज्ञान म्हणजे सातवे दर्शन आहे. भारतातील अद्वैत, न्याय, सांख्य, जैन इ. सहा दर्शने माणसाच्या जगण्याविषयी आणि त्यापेक्षाही मुक्तीविषयी बोलतात. हिंदू धर्माव्यतिरिक्त इतर धर्मही धार्मिक परंपरा आणि चालीरीतींना महत्त्व देतात. कृष्णमूर्तींनी या सार्‍याला फाटा देऊन केवळ मन, विचार आणि भावना यांचा विचार आणि विश्लेषण यातून जाणारी मुक्तीची वाट सांगितली किवा त्याहीपेक्षा त्या वाटेकडे निर्देश केला. त्या वेगळेपणामुळे आल्डस हक्सले, डेव्हिड बोम यांसारखे विचारवंत, नेहरूंपासून अच्युतराव पटवर्धनांपर्यंतचे राजकारणी, चार्ली चॅप्लिनपासून ग्रेटा गार्बोपर्यंतचे अभिनेते त्यांच्या शिकवणीकडे आकर्षित झाले. इंदिरा गांधी असो की विमला ठकार असो, त्यांच्या जीवनात कृष्णमूर्तींचे काही तरी योगदान आहेच. अगदी ओशोही सांगत की, कृष्णमूर्ती जे सांगतात तेच मी सांगतो. असे काय होते त्यांचा शिकवणीत?
जे. कृष्णमूर्ती लहान असताना त्यांना मद्रासला अड्यारच्या समुद्रकिनार्‍यावर थिओसॉफिकल विचारवंत चार्ल्स लिडबिटर यांनी पाहिले. त्यांच्याभोवतीचे वलय पाहून लिडबिटरने त्यांना आपल्याकडे ठेवले आणि इंग्रजी शिक्षण द्यायला आणि संस्कार करायला सुरुवात केली. त्यांना आणि त्यांचा भाऊ नित्या यांना इंग्रजी शिक्षणासाठी युरोपला पाठवण्यात आले. अभ्यासात कृष्णमूर्ती यांना रुची नव्हती; पण ते उत्तम इंग्रजी लिहा-वाचायला शिकले. अ‍ॅनी बेझंट यांना ते आई मानत. थिऑसॉफी संस्थेतर्फे असा प्रचार करण्यात आला की, एका महान अवताराने जन्म घेतलेला आहे. लहान असतानाच त्यांनी ‘अ‍ॅट दी फिट ऑफ मास्टर’सारख्या पुस्तिका लिहिल्या. त्यांच्या नावाने ‘ऑर्डर ऑफ द स्टार’ नावाची संस्था स्थापन करण्यात आली. जगभरातून त्यांच्यासाठी पैसा आणि जमीन देणगीरूपात मिळायला लागली. नेदरलँडमध्ये त्यांना प्रशस्त वाडा देणगीरूपात मिळाला होता.
1922मध्ये ओझाई इथल्या मुक्कामात कृष्णमूर्तींना काही वेगळाच अनुभव आला. त्यांचे शरीर विलक्षण वेदनांतून जात होते. साक्षात्काराप्रमाणे हा अनुभव होता. या काळात त्यांच्याबरोबर असलेल्या मेरी ल्युटेसने याचे वर्णन केले आहे. त्या अनुभवानंतर कृष्णमूर्तींच्या विचारात मोठा बदल झाला. 3 ऑगस्ट 1929रोजी त्यांनी एका सभेत ऑर्डर ऑफ द स्टार ही संस्था विसर्जित करून टाकली आणि स्वत:ला मिळालेल्या सर्व देणग्या परत केल्या. ज्यात लक्षावधी रुपये आणि 5000 एकर जमीन होती. त्याच सभेत त्यांनी जाहीर केले की, सत्यापर्यंत जाणारा कुठलाही विशिष्ट मार्ग आणि पद्धत नाही. Truth is the pathless land. आणि त्यानंतर पुढची जवळजवळ 56 वर्षे त्यांनी जगभर प्रवास केला. आपल्याला जे कळले आहे त्याच्याबद्दल भाषणे दिली. विविध धर्म-पंथांच्या लोकांशी, गांधीवाद्यांपासून तिबेटी संन्याशांपर्यंत विविध धर्मांच्या, विचारसरणीच्या लोकांशी संवाद साधला. त्यांच्या शिकवणीचे मर्म म्हणजे ‘एकेका क्षणात जगणे’, ‘स्वत:चा मुक्तीचा मार्ग स्वत:च शोधून काढणे; कोणताही गुरू किंवा धर्म यांच्यामुळे तो मार्ग मिळत नाही, हे लक्षात घेणे.’ ‘विचार ही माणसाला मिळालेली देणगी असून अनेकदा विचारामुळे दु:खाचा उद्भव होतो, हे जाणून घेणे.’ स्मरणशक्तीने अनेकदा दु:खाची कशी निर्मिती होते ते जाणून घेणे, यावर त्यांनी भर दिला. ते म्हणत, ‘तुम्ही दुकानात जाता, चांगले कापड पाहता.
ते पाहताना, त्याला स्पर्श करताना ते आपल्याजवळ असावे, त्याने बनलेले कपडे आपण घालावे, अशी इच्छा निर्माण होते. इच्छेच्या निर्मितीची प्रक्रिया सजग राहिल्याने आपल्याला पाहता येते.’ अशा सजगतेमुळे आपण त्यातून मुक्त होऊ शकतो, म्हणूनच आपल्या मनात उद्भवणारे विचार हस्तक्षेप न करता आपण पाहायला हवे. याला ते choiceless awareness असा शब्द वापरतात.
राष्टÑवाद, मानवी नाती, एकटेपणा, लैंगिकतेचे जीवनातील स्थान, शिक्षण, सर्जनशीलता अशा विविध विषयांवर त्यांनी आपल्या भाषणांमधून भाष्य केले आहे. Commentries on living हे त्यांचे पुस्तक आहे. यात विविध समस्या घेऊन आपल्याकडे येणार्‍या व्यक्तींशी त्यांनी संवाद केला आहे. त्यात अगदी पंडित जवाहरलाल नेहरूही आहेत. मानवी नात्याबद्दल बोलताना जे. कृष्णमूर्ती सांगतात, ‘नवर्‍याच्या मनात बायकोबद्दल एक प्रतिमा असते आणि बायकोच्या मनात नवर्‍याबद्दल. दोघे एकमेकांना न भेटता त्यांच्या प्रतिमाच एकमेकांना भेटतात.’ इतर आध्यात्मिक मंडळींप्रमाणे ते लैंगिकतेचे महत्त्व नाकारत नाहीत किवा ब्रह्मचर्याला महत्त्व देत नाहीत.
सेक्स ही एक सुंदर गोष्ट आहे आणि तिची इच्छा दाबून टाकणे अनैसर्गिक आहे, असे ते मानतात. ते म्हणतात, ‘दोन वेळ जेवणे आणि भूक लागणे नैसर्गिकच आहे, पण त्याचा सतत विचार करू लागलो तर ती विकृती ठरते.’ या प्रकारे अनेक विषयांवर त्यांनी The first and last freedom पुस्तकात भाष्य केले. त्यानंतर अनेक पुस्तकांतून त्यांचे विचार जगासमोर येत गेले. ते समजायला कठीण असले तरी बुद्धी आणि विचारांना चालना देऊन जगणेही समृद्ध करणारी ती एक शिकवण आहे.
shashibooks@gmail.com