आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shinawatra Against Allegations Of Abuse Of Power

शिनवात्रांच्या भाग्याचा आज होणार फैसला, पदाचा गैरवापर केल्याचा ठपका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक - पदाचा गैरवापर केल्याचा ठपका असलेल्या थायलंडच्या पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांनी मंगळवारी संवैधानिक न्यायालयात स्वत:चा जोरदार बचाव केला. परंतु न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले तर त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. तसे झाले तर देशात राजकीय संकट निर्माण होऊ शकते.
यिंगलूक (46) यांनी मंगळवारी घटनापीठासमोर हजेरी लावली. त्यात त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावताना आपण निष्पाप असल्याचा दावा केला. मी कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. त्याचबरोबर कोणाच्या नियुक्तीसाठी काही फायदादेखील लाटलेला नाही, असे त्यांनी कोर्टासमोर सांगितले. त्यांच्या विरोधात काही सिनेटर्सकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. नऊसदस्यीय पीठाचे अध्यक्ष चारून इंटाचान यांनी सर्व साक्षी-पुरावे ऐकून घेतले आहेत. त्यामुळे सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता 7 मे रोजी निकाल दिला जाईल, असे इंटाचान यांनी मंगळवारी स्पष्ट केले. यिंगलूक यांच्यावर दोन खटले चालवण्यात येत आहेत. त्यांच्यावरील खटल्याचा निकाल काय लागतो, याकडे यिंगलूक समर्थक व विरोधक यांचे लक्ष लागले आहे. कोर्टाने त्यांच्याविरोधात निकाल दिला तर त्यांना पद सोडावे लागेल. निकाल विरोधात गेल्यास सरकार समर्थक रेड शर्ट्सचे कार्यकर्ते देशभरात जोरदार आंदोलन करू शकतात.
पुन्हा राजकीय अस्थैर्याचा धोका
देशात जुलै महिन्यात निवडणूक होऊ घातली आहे. त्यातच यिंगलूक यांना पद सोडावे लागले तर देशात राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. देशात सहा महिने चाललेल्या राजकीय हिंसाचारात 25 जण ठार झाले होते.