आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यायालयात परवेझ मुशर्रफांवर बूट फेकला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कराची - शुक्रवारी भरन्यायालयात पाकिस्तानचे माजी लष्करशहा परवेझ मुशर्रफ यांच्यावर बूट फेकण्यात आला. सन 2007 मध्ये लाल मशिदीवरील कारवाईच्या निषेधार्थ एका वकिलाने त्यांच्यावर बूट भिरकावून आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.

जोडा खाण्याची मुशर्रफांची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी ब्रिटनमध्येही त्यांच्यावर बूट फेकण्यात आला होता. बेनझीर भुत्तोंच्या हत्या प्रकरणासह विविध खटल्यांमध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मुशर्रफ शुक्रवारी सिंध न्यायालयात आले होते. न्यायालयाने त्यांना 15 दिवसांचा जामीन मंजूर केला.परंतु देश सोडण्यास मनाई केली आहे. त्यानंतर न्यायालयातून बाहेर पडताना मुशर्रफांच्या दिशेने एक बूट आला; परंतु फूटभर अलीकडेच पडला. हा बूट ताजमुल लोधी या वकिलाने फेकला होता. बूट भिरभिरत येऊन खाली पडताच न्यायालयाच्या परिसरात एकच गोंधळ उडाला. बूट फेकणा-या वकिलास पाकिस्तानी रेंजर्सनी अटक केली. अज्ञात स्थळी नेऊन त्याची चौकशी केली जात आहे.


वकील-समर्थकांमध्ये बाचाबाची : व्हीआयपी प्रवेशद्वारातून मुशर्रफ न्यायालयाच्या परिसरात येताच वकिलांची त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. त्या वेळी समर्थक आणि वकिलांमध्ये बाचाबाची झाली. सुरक्षा रक्षकांनी मुशर्रफांना सुरक्षितपणे बाहेर काढले.


आईचे समाधान झाले
लाल मशिदीवरील कारवाईनंतर माझी आई मुशर्रफांवर प्रचंड संतापली होती. तेव्हापासून ती त्यांचा तिरस्कार करते. आज माझ्या कृतीमुळे तिला समाधान वाटले असेल, असे लोधी याने सांगितले.


ब्रिटनमध्येही प्रसाद
सन 2011 मध्ये ब्रिटन येथे एका सभेत बोलताना मुशर्रफांवर बूट फेकण्यात आला होता. त्यामुळे बूट अंगावर घेण्याची ही घटना त्यांच्यासाठी नवीन नव्हती.


चौकशीचे आदेश : भरन्यायालयात बूट फेकल्याची उच्च् न्यायालयाने गंभीर दखल घेतली. मुख्य न्यायमूर्ती मुशीर आलम यांनी बूट फेक ल्याची तसेच त्यानंतर उडालेल्या गोंधळाची चौकशी करण्याचे आदेश दिले.