आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावॉशिंग्टन- अमेरिकेत गोळीबाराच्या घटना सुरूच असून कॅलिफोर्नियात एका माथेफिरू तरुणाने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात सहा जण ठार झाले. ही घटना एका महाविद्यालयाच्या ग्रंथालयात घडली. या वेळी झालेल्या चकमकीत हल्लेखोरही ठार झाला. विशेष म्हणजे येथून काही किलोमीटरवरील निधी संकलनाच्या एका समारंभाला राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हजेरी लावण्यासाठी आलेले असताना ही घटना घडली.
दक्षिण कॅलिफोर्नियातील हा हिंसाचार घरापासून सुरू होऊन कॉलेज आवारात संपल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मृतांमध्ये सर्व महिलांचा समावेश आहे. सर्व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. यातील जखमींमधील दोन महिलांची स्थिती गंभीर आहे. हल्लेखोर तरुण 25 ते 30 वयोगटातील आहेत. काळ्या रंगाचे जॅकेट परिधान केलेल्या या तरुणाला ग्रंथालयात रोखण्यात आले. त्या वेळी झालेल्या प्रचंड गोळीबारात तो ठार झाला. या घटनेमागे केवळ एकाचा हात असेल असे आम्ही खात्रीपूर्वक सांगू शकणार नाहीत, असे सांता मोनिका पोलिसप्रमुख जॅकलिन सीब्रुक्स यांनी सांगितले. याप्रकरणी इंटरनेट चालवणार्या अन्य एका व्यक्तीला अटक केल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा एका समारंभाला हजेरी लावण्यासाठी गेले होते त्या वेळी हा गोळीबार सुरू होता. ओबामा यांच्या समारंभ स्थळापासून ही घटना केवळ चार-साडेचार किलोमीटर अंतरावर घडली. चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासमवेतच्या परिषदेला हजेरी लावण्यासाठी ते जात असताना सांता मोनिका कॉलेजमध्ये गोळीबार सुरू होता. हल्लेखोराचा पाडाव करण्यासाठी पोलिसांनी गोळीबाराची कारवाई केली, तर कोणताही धोका टाळण्यासाठी सुरक्षा दलाने त्यांना हवाईमार्गे रवाना केले, असे सूत्रांनी सांगितले.
कॉलेज ग्रंथालयात थरार, मृतांत महिला
घटनेने पोलिस सुन्न
दक्षिण कॅलिफोर्नियातील गोळीबारात एक हल्लेखोर आहे की आणखी काही असू शकतील याचा अंदाज बांधणेही पोलिसांना अजूनपर्यंत शक्य झालेले नाही. एकूण घटनेत अनेक ठिकाणी गोळीबार झाला. त्यात महिलांना लक्ष्य करण्यात आले आहे. हल्ल्यामागील कारण समजणे कठीण झाल्याने पोलिस यंत्रणा तूर्त तरी सुन्न झाल्याचे दिसते.
सहा ठिकाणी गोळीबार
दक्षिण कॅलिफोर्नियाच्या सहा वेगवेगळ्या भागांत हा अंदाधुंद गोळीबार झाला. हल्लेखोर धावत गोळीबार करत सांता मोनिका कॉलेज परिसरात घुसला होता. त्याने कॉलेजच्या ग्रंथालयात प्रवेश केला. तेथे त्याने निर्दयीपणे हे कृत्य केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.
रायफल घेऊन कॅम्पसमध्ये
काळ्या रंगातील कपडे परिधान केलेल्या तरुणाच्या हाती रायफल होती. तो सांता मोनिका कॉलेज कॅम्पसमध्ये शिरला आणि काही वेळातच जोरदार गोळीबार सुरू झाला, असे प्रत्यक्षदर्शी जॅसन गॅरेट यांनी सांगितले. अगोदर मला काहीतरी आवाज आला, परंतु तो गोळीबाराचा आवाज असल्याचे नंतर लक्षात आले. तिने कक्षातून बाहेर येऊन पाहिले तर समोर गडद काळ्या केसांचा एक तरुण दिसला. त्याला पाहून आपण पळतच सुटल्याची थरारक आठवण एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितली.
महिलेचे अपहरण करून गोळ्या घातल्या
हल्लेखोराने एका महिलेला कारमधून अपहरण करून नेले. त्याअगोदर तिच्यावर गोळीबार करून तिला जखमी केले होते. त्यानंतर तो आपली कार घेऊन कॉलेज कॅम्पसमध्ये घुसला. तेथे त्याने काही महिलेस ठार मारले, असे कॉलेजच्या जवळ राहणार्या जेरी कनिंगहम राथनर यांनी सांगितले. त्यांचे घर सांता मोनिका कॉलेजच्या जवळ आहे. राथनर यांनी गोळीबाराचा आवाज ऐकून गच्चीवरून हा थरार पाहिला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.