आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रावणाचे वंशज: श्रीलंकेचे अत्याचार पाहून जग शहारले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनिव्हा- 26 वर्षांपासून सुरू असलेले गृहयुध्द कायमचे संपवण्यासाठी श्रीलंकन सरकार आणि लष्कराने तामिळ जनतेवर केलेल्या राक्षसी अत्याचारावरील माहितीपटाचे शुक्रवारी संयुक्त राष्ट्राच्या मुख्यालयात प्रदर्शन करण्यात आले. हा माहितीपट पाहून जगभरातील प्रतिनिधींच्या अंगावर काटे आले.
‘नो फायर झोन-द किलिंग फिल्डस् ऑफ श्रीलंका’ असे या माहितीपटाचे नाव असून ब्रिटनच्या चॅनल फोर वाहिनीने हा माहितीपट तयार केला आहे. श्रीलंका सरकारने केलेले युध्दातील अपराध आणि मानवतेविरुद्धचे क्रूर गुन्ह्यांचा हा ढळढळीत पुरावा असल्याचे माहितीपटाचे निर्माते क ॅलम मॅकरे यांनी माहितीपट सुरू होण्यापूर्वी ठणकावून सांगितले. या माहितीपटाद्वारे सत्य बाहेर येईल असे ते म्हणाले.

आंतरराष्ट्रीय कारस्थान - श्रीलंका
माहितीपटाच्या स्क्रीनिंगला श्रीलंकेने कडाडून विरोध केला होता. आपल्या देशाविरोधातील हे कुटिल कारस्थान असल्याचा आरोप संयुक्त राष्ट्रातील श्रीलंकेचे राजदूत रविंथा आर्यसिन्हा यांनी केला. संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेच्या तोंडावर हे कारस्थान रचण्यात आल्याचे ते म्हणाले.

श्रीलंका सरकारचा संशय :
माहितीपटाच्या खरेपणाबद्दलही श्रीलंकेने संशय व्यक्त केला आहे.तर सर्व चित्रीकरणाचे काळजीपूर्वक तपासणी आणि विश्लेषण करून व त्यात
छेडछाड झाली नसल्याचे पाहूनच माहितीपट तयार केल्याचे निर्माते मॅकरे यांनी ठणकावून सांगितले.

‘नो फायर झोन-द किलिंग फिल्ड्स ऑफ श्रीलंका’

अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा पुढाकार
अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल आणि ह्युमन राइट्स वॉच संघटनेच्या वतीने माहितीपटाचे स्पेशल स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते.या अत्याचारांची आंतरराष्ट्रीय पातळीवर चौकशी झाली पाहिजे असे अ‍ॅम्नेस्टीने म्हटले आहे. श्रीलंकेच्या स्थानिक लेसन्स लर्न आणि रिकन्सिलिएशन क मिशनने (एलएलआरसी )लष्कराच्या पापावर पांघरुण टाकल्याचा आरोप केला आहे.

139 दिवसांचे चित्रीकरण या माहितीपटात आहे. लिट्टे संघटनेचे सदस्य,सामान्य जनता आणि श्रीलंकेच्या जवानांनी चित्रीकरण केलेल्या विविध फिल्मवरून हा माहितीपट तयार करण्यात आला आहे.

40 हजार तामिळींना अखेरच्या दिवसांमध्ये ठार मारण्यात आले असे संयुक्त राष्ट्राच्या अहवालात म्हटले आहे.यापैकी हजारो लोक लष्कराच्या अंदाधुंद गोळीबार,तोफगोळ्यांच्या वर्षावात मारले गेले.

संयुक्त राष्‍ट्रात प्रस्ताव
संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेची येत्या 22 मार्च रोजी बैठक होत आहे. या बैठकीत मानवी हक्कांची पायमल्ली केल्याबद्दल अमेरिका श्रीलंकेविरोधात प्रस्ताव आणणार आहे. या प्रस्तावाच्या बाजूने मतदान करण्याची मागणी तामिळनाडूतील द्रमुक, अण्णाद्रमुकसह विविध राजकीय पक्षांनी यूपीए सरकारकडे केली आहे.

प्रभाकरनच्या मुलास गोळ्या घातल्या
तामिळ संघटना (लिट्टे)चा प्रमुख व्ही.प्रभाकरनचा मुलगा बालचंद्रनलाही लष्कराने निर्घृणपणे गोळ्या घातल्या.एका प्रसंगात तो बिस्कीट खाताना दिसतो. त्यानंतर दोन तासांनी घेतलेल्या प्रसंगात बालचंद्रनचा मृतदेह दिसतो. त्याच्या छातीवर पाच गोळ्या झाडण्यात आल्या होत्या.

नाझींसारखे अत्याचार
जानेवारी 2009 मध्ये श्रीलंका सरकारने ‘नो फायर झोन’ तयार केला होता. हे ठिकाण सुरक्षित असेल या आशेवर हजारो तामिळ नागरिकांचे लोंंढेच्या लोंढे या भागात आले. त्यांच्यावर चोहोबाजूंनी अक्षरश:तोफगोळे डागण्यात आले. अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. एवढेच नव्हे तर सरकारी मदत केंद्रे,रुग्णालयांवरही तोफगोळे डागून ते बेचिराख करण्यात आले. माहितीपटात महिला, मुलांचे मृतदेह इतस्तत: पडल्याचे दिसते.