आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियाच्या उपराष्ट्राध्यक्षांच्या पलायनाची अफवा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दमास्कस - सिरियाचे उपराष्ट्राध्यक्ष फारुक अल शारा यांनी देशातून पलायन केले असून त्यांनी असाद सरकारविरोधातील बंडखोरांशी हातमिळवणी केली असल्याची चर्चा आहे. तर शारा देशातच असल्याचा दावा सिरियन सरकारी दूरचित्रवाणीने केला आहे. दरम्यान, सिरियातील रक्तपात थांबवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने आता अल्जेरियाचे ज्येष्ठ मुत्सद्दी लखदर ब्राहिमी यांची संयुक्त विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केली आहे.
अल्पसंख्याक अलवाईट समुदायाची सत्ता असलेल्या बशर अल असाद यांच्या राजवटीत 73 वर्षीय शारा गेल्या 30 वर्षांपासून विविध पदांवर आहेत. असाद यांचे विश्वासू आणि सुन्नी मुस्लिम समुदायाचे शक्तिशाली नेते म्हणून ते ओळखले जातात. सन 2006 मध्ये त्यांना उपराष्ट्राध्यक्षपदावर बढती देण्यात आली होती. तत्पूर्वी 20 वर्षे शारा यांनी परराष्ट्र मंत्रिपदाचा कार्यभार सांभाळला होता.
शारा बंडखोरांना जाऊन मिळाले अशी बातमी प्रथम गुरुवारी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर सिरियन सरकारने शुक्रवारी हे वृत्त फेटाळले. शारा यांनी देश सोडण्याचा अथवा इतरत्र जाण्याचा विचारही केलेला नाही, असा दावा सरकारी दूरचित्रवाणीने केला होता. मात्र ते देशातच असल्याच्या पुराव्यादाखल एखादी चित्रफीतही दाखवण्यात आली नाही. मात्र संयुक्त राष्ट्र व अरब लीगचे माजी दूत कोफी अन्नान यांच्या जागी ब्राहिमी यांची निवड केल्याबद्दल सिरिया सरकारने अभिनंदन केले आहे.