आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sisi Sworn In As Egypt's President, Cool Reception From West

इजिप्तच्या राष्ट्राध्यक्षपदी माजी लष्करशहा सिसी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कैरो - इजिप्तमध्ये मे महिन्यात झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत बहुमताने विजयी झालेले अब्देल फत्ताह अल-सिसी यांनी देशाचे नवीन राष्ट्राध्यक्ष म्हणून पदाची सूत्रे रविवारी स्वीकारली.

रविवारी झालेल्या समारंभात माजी लष्करप्रमुख सिसी यांनी निळ्या रंगाचा वेस्टर्न सूट परिधान केला होता. त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. या प्रसंगी त्यांना बंदुकीच्या 21 फैरी झाडून सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत झाले. गेल्या आठवड्यात 59 वर्षीय सिसी यांना देशाचे नूतन राष्ट्राध्यक्ष म्हणून जाहीर करण्यात आले होते. त्यांना 96. 6 टक्के मते पडली. इस्लामी नेते मोहंमद मुर्सी यांना पदावरून हटवल्याच्या एक वर्षानंतर ही निवडणूक पार पडली होती.

सिसी हे देशाचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. दुसरीकडे रविवारी राष्ट्रीय सुटी जाहीर करण्यात आली आहे. समारंभाला पंतप्रधान इब्राहिम महलाब, सिसी यांच्या पत्नी आणि मुलेदेखील उपस्थित होते. दरम्यान, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी सिसी यांनी याच वर्षी लष्करप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. निवडणूक रिंगणात त्यांच्या विरोधात केवळ हामदीन साबाही नावाचा एकमेव उमेदवार होता.

काय आहेत आव्हाने ?
अर्थव्यवस्थेला सुस्थिती आणणे, राजकीय संघर्ष टाळणे, गरिबी, देशातील बंडखोरांचे हल्ले रोखणे. देशात गेल्या 11 महिन्यांत शेकडो सुरक्षा रक्षक मृत्युमुखी पडले. मुर्सी यांच्या मुस्लिम ब्रदरहुड संघटना आणि सहकारी संघटनेने केलेल्या आंदोलनात 1400 जणांचा मृत्यू झाला होता.

स्वातंत्र्य, सामाजिक न्याय देऊ -सिसी
पदभार स्वीकारल्यानंतर सिसी यांनी राष्ट्रीय टीव्ही वाहिनीवरून नागरिकांशी संवाद साधला. आपल्या भाषणात सिसी यांनी स्वातंत्र्य, सामाजिक न्यायाचा मुद्दा मांडला.

भारताकडून अभिनंदन
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिसी यांना विजयाबद्दल अभिनंदनाचा संदेश पाठवला आहे. तुमच्या सक्षम नेतृत्वाखाली इजिप्तमध्ये स्थैर्य आणि समृद्धीचे नवे युग सुरू होईल. त्याचबरोबर दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला आहे.

हल्ल्याचा धोका
सिसी यांच्या शपथ समारंभाच्या निमित्ताने राजधानी कैरोमध्ये अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. माजी लष्करप्रमुख असलेल्या सिसी यांना विरोधकांकडून लक्ष्य केले जाऊ शकते, असा इशारा गुप्तहेर यंत्रणांकडून देण्यात आला होता.

मोहंमद मुर्सी यांची निवडणुकीतून राष्ट्राध्यक्ष पदावर निवड झाली होती. लोकशाही मार्गाने निवडले गेलेले मुर्सी हे देशातील पहिले नेते होते, परंतु त्यांना सिसी यांनी पदावरून हटवले. गेल्या तीन वर्षांपासून देशात सातत्याने अस्थैर्य निर्माण होत असल्यावरून सिसी यांनी मुर्सी यांना हटवले होते. त्यातून सिसी यांच्या विरोधातील मोठा गट कार्यरत असल्याचे सांगण्यात येते.