वॉशिंग्टन - आर्थिक तंगीत अडकलेल्या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासाच्या बचावासाठी सहा वर्षांच्या मुलाने पुढाकार घेतला आहे. अंतराळ शास्त्रज्ञ होण्याचे ध्येय बाळगून असलेल्या डेनव्हरच्या कोन्नर जॉन्सनने यासाठी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याकडे ऑनलाइन याचिका दाखल केली आहे. नासाच्या अंतराळ प्रकल्पासाठी निधी वाढवण्याची मागणी त्याने याचिकेत केली आहे.
अमेरिकी संसद, काँग्रेसने नासाच्या निधीत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. कोन्नरला याविषयी माहिती समजल्यानंतर त्याच्या भविष्यातील योजनांवर पाणी पडण्याची शक्यता निर्माण झाली.नासाच्या निधीबाबत राष्ट्राध्यक्षांना पत्र लिहिले असून माझ्या पिग्गी बँकेत जमा असलेले सर्व 10.41 डॉलर (673 रुपये) नासाला देण्याचा निर्णय घेतला आहे, असे जॉन्सनने सांगितले. तो नासापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात असल्याचे एनबीसी संबंधित कुसा टीव्हीच्या वृत्तात म्हटले आहे. याचिकेतील मजकूर जॉन्सननेच तयार केला आहे. या कामात आई-वडिलांनी त्याला मदत केली.