आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Snowden Seeks Asylum In India, 19 Other Countries

एडवर्ड स्‍नोडेनला भारताने राजाश्रय नाकारला, परराष्‍ट्र मंत्रालयाने विनंती फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेची गुप्तहेर संस्‍था 'सीआयए'चा माजी कर्मचारी एडवर्ड स्नोडेन याने भारतासह 20 देशांमध्ये राजाश्रय मागितल्‍याचा खुलासा विकि‍लीक्‍सने केला आहे. परंतु, भारताने त्‍याची मागणी फेटाळली आहे.

यासंदर्भात परराष्‍ट्र मंत्रालयाच्‍या प्रवक्त्यांनी सांगितले, की मॉस्‍को येथील भारतीय दूतावासामध्‍ये 30 जूनला स्‍नोडेन यांची राजाश्रयाबाबत विनंती प्राप्‍त झाली होती. ही विंनती आम्‍ही काळजीपूर्वक तपासली. त्‍यासंदर्भात सखोल विचार करण्‍यात आला. त्‍यानंतर विनंती फेटाळण्‍यात आली. स्‍नोडेन यांची विनंती मान्‍य करण्‍याचे कोणतेही कारण आम्‍हाला योग्‍य वाटले नाही.


स्नोडेनच्या वतीने ब्रिटनमधील नागरिक आणि स्‍नोडेन प्रकरणात विकिलीक्‍सच्‍या कायदेविषयक सल्‍लागार सारा हॅरियन यांनी विनंती केली होती. त्‍यांनी सांगितले, की सर्वप्रथम इक्‍वेडोर आणि आईसलँडला विनंती करण्‍यात आली होती.

विकिलीक्सने दिलेल्या माहितीनुसार, स्नोडेन याने भारतासह रशिया, ऑस्ट्रिया, बोलेव्हिया, ब्राझील, चीन, क्यूबा, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, इटली, नेदरलँड, निकारागुआ, नॉर्वे, पोलँड, स्पेन, स्वित्झरर्लंड आणि व्हेनेझुएला या देशांमध्ये राजाश्रय देण्याची विनंती केली आहे.

अमेरिकेने मात्र स्‍नोडेनला राजाश्रय देणा-या देशांना इशारा दिला आहे. स्‍नोडेनने आत्‍मसमर्पण केल्‍यास त्‍याच्‍यविरुद्ध खटला चालविण्‍यात येईल. त्‍यात त्‍याला त्‍याची बाजू मांडण्‍याची पूर्ण संधी दिली जाईल. तसेच त्‍याचे अमेरिकन नागरिकत्त्वही अबाधित राहील, असे आश्‍वासनही देण्‍यात आले होते. स्‍नोडेन अजुनही अमेरिकेचाच नागरिक असल्‍याचेही अमेरिकेने स्‍पष्‍ट केले आहे.

स्नोडेनवर अमेरिकेतील गुप्त माहिती उघड केल्याचा आरोप आहे. त्याने जाहीर केलेल्या माहितीमध्ये अमेरिकेने भारतीय दुतावासासह 38 देशांच्या दुतावासावर लक्ष ठेवल्याचे उघड झाले होते. यासाठी अमेरिकेने 'प्रिझम' ही यंत्रणा वापरली होती.