आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइस्लामाबाद- 1999 मध्ये झालेल्या कारगिल युद्धात मुजाहिदीन नव्हे तर पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची कबुली पाकिस्तानच्या एका माजी उच्चपदस्थ लष्करी अधिका-याने दिली आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल शाहिद अझिझ यांनी हा खळबळजनक खुलासा केला असून या युद्धाचे खापर त्यांनी तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्यावर फोडले आहे.
कारगिल युद्ध झाले त्यावेळी लेफ्ट. अझिझ हे आयएसआयच्या तपास विभागाचे प्रमुख होते. त्यांनी 'द नेशन' या वर्तमानपत्रात लिहीलेल्या एका लेखात कारगिल युद्धामागिल पाकिस्तानचे सत्य उघड केले. ते म्हणाले, कारगिल युद्धात मुजाहिदीन नव्हते. तर पाकिस्तानी सैनिक सहभागी झाले होते. कारगिलमागील पूर्ण सत्य अद्याप समोर आलेले नाही. परंतु, या युद्धात निरपराध सैनिक मारल्या गेले. पाकिस्तानी सैनिकांना रिकाम्या बंदुका हाती घेऊन तिथे पाठविले होते. कोणत्याही कारणाविना त्यांचे रक्त सांडले. परंतु, परवेझ मुशर्रफ यांनी हा संपूर्ण प्रकार दडवून ठेवला होता. काही वर्षांनी मुशर्रफ यांचे सत्य उघड झाले.
अझिझ म्हणतात, कारगिल मोहिम पूर्णपणे फसली होती. खरे तर ती फसणारच होती. कारण त्यामागे कोणतीही योजना नव्हती. कोणतीही पूर्वतयारी नव्हती. या मोहिमेला राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतेही समर्थन मिळाले नसते. त्यामुळे प्रचंड गोपनियता बाळगण्यात आली. सियाचीन हिमनदी परिसरातील भारतीय सैन्याला होणारा रसदपुरवठा तोडण्याच्या हेतूने ही मोहिम आखण्यात आली होती. परंतु, भारताने प्रतिहल्ला केल्यानंतर पाकिस्तानला युद्धात तोंडघशी पडावे लागले.
लेफ्ट. अझिझ यांच्या या खुलाशानंतर पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगलीच अडचण होणार आहे. कारगिल युद्धामध्ये पाकिस्तानी लष्कर नव्हे तर मुजाहिदीन संघटनांचा सहभाग होता, असा पाकिस्तानने नेहमीच कांगावा केला आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारचे पितळ उघडे पडले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.