आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमालियाच्या संसदेवर बंडखोरांचा हल्ला; चार हल्लेखोरांसह 10 ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोगादिशू- सोमाली संसद शनिवारी बॉम्बस्फोट आणि गोळीबाराने हादरली. कट्टरवादी शेबाब गटाच्या हल्लेखोरांनी कार बॉम्ब, आत्मघाती पथकाद्वारे हा हल्ला केला.
संसदेच्या प्रवेशद्वाराजवळ कार बॉम्बने स्फोट घडवण्यात आला. त्यामुळे संसदेची इमारत हादरली होती. स्फोटानंतर इमारतीच्या अंतर्गत गाळ्यांना हल्लेखोरांनी लक्ष्य केले. परिसरात गोळीबारही झाला. घटनेत चार हल्लेखोर आणि 6 पोलिस व सैनिक ठार झाले, असे पोलिसांनी सांगितले. त्यात अनेक नागरिक जखमी झाले.

शेबाब गटाचा संबंध अल कायदा संघटनेशी आहे. हल्ला झाला त्या वेळी संसद सभागृहात लोकप्रतिनिधींची बैठक सुरू होती, परंतु जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. संसद इमारतीच्या जवळ हा हल्ला झाल्याने सुरक्षा यंत्रणा हादरली आहे. वास्तवात सोमालीचा संसद परिसर म्हणजे नेहमी लष्करी छावणी असते. एवढा कडक बंदोबस्त असतानाही बंडखोरांनी हल्ला केला. शेबाबचा प्रवक्ता अब्दुलाझीझ अबू मुसाब याने हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शेबाब गटाने केलेल्या हल्ल्यात सातत्याने सरकारी व सुरक्षा दलाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून आले आहे. याअगोदर शेबाबने फेब्रुवारीमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानावर हल्ला केला होता. आत्मघाती हल्ल्यात हल्लेखोरांसह 16 जण ठार झाले होते.

पोलिस किंवा लष्करी वेशात येऊन हल्ला करण्याची शेबाब बंडखोर गटाची पद्धत आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात नैरोबी येथील वेस्टगेट मॉलमध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यामागे शेबाब गटाचाच हात होता. त्यात 67 जणांचा मृत्यू झाला होता.