आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sri Lanka Rejects US Resolution, Seeks A Vote At UN Meet

श्रीलंकेविरोधात ठराव मंजूर; भारतासह 25 देशांचा पाठिंबा, पाक लंकेच्या पाठीशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिनिव्हा- श्रीलंकेतील तामिळींच्या मानवी हक्काच्या उल्लंघन प्रकरणात गुरुवारी संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेत मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. अमेरिकेने सादर केलेल्या या ठरावाच्या बाजूने भारतासह 25 देशांनी कौल दिला, तर 13 देशांनी त्याच्या विरोधात मतदान केले. अमेरिकेच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या मसुद्याचे भारताने समर्थन केले असले तरी पाकिस्तानसह 13 देशांनी त्यास विरोध दर्शवला आहे. तामिळी समुदायाकडून होणा-या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मानवी हक्काच्या मुद्द्यावर स्वतंत्र आणि नि: पक्ष चौकशी व्हावी, असे भारताने ठरावाच्या लेखी दुरुस्तीच्या मागणीत म्हटले आहे. श्रीलंकेतील मानवी हक्काची पायमल्ली आणि नागरिकांच्या मृत्यू प्रकरणात आम्ही स्वतंत्र चौकशी मागणी केली आहे, असे भारताचे संयुक्त राष्ट्रातील स्थायी प्रतिनिधी दिलीप सिन्हा यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रामध्ये मांडण्यात आलेला ठराव कधीही स्वीकारला जाऊ शकत नाही. आम्ही हा ठराव कधीही मान्य करू शकत नाहीत, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेकडून देण्यात आली आहे.

मिळमिळीत ठराव - देशातील तामिळ समुदायाच्या मानवी हक्काची पायमल्ली करण्याच्या प्रकरणात श्रीलंकन सरकारकडून 2009 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेत काही आश्वासने देण्यात आली होती; परंतु ती पाळण्यात आली नाही. तामिळींवरील अन्यायासंदर्भातील चौकशीत अनेक वर्षांत काहीही प्रगती झाली नाही. त्याविषयी भारताने वारंवार चिंता व्यक्त केली होती; परंतु भारताकडून संयुक्त राष्ट्राच्या बैठकीत ठरावातील मसुद्यावर कसलाही आक्षेप घेतला नाही. मानवी हक्काची पायमल्ली झाल्याने श्रीलंकेवर कडक कारवाई करणारा ठराव अपेक्षित होता; परंतु केवळ स्वतंत्र, नि:पक्ष चौकशी करण्याची सूचना श्रीलंकेला देण्याचा मुद्दा समाविष्ट आहे. या मुद्द्यावर भारताकडून जोर देणे आवश्यक होते. मात्र, तसे झाले नाही. त्यामुळे तामिळी जनतेमध्ये निराशा आणि संताप व्यक्त झाला आहे.

केंद्रावर टीका - संयुक्त राष्ट्रामध्ये श्रीलंकेतील तामिळी बांधवांना न्याय मिळवून देण्यास केंद्र सरकारला अपयश आले आहे. श्रीलंकेविरुद्धच्या अमेरिकेने तयार केलेल्या दुबळ्या ठरावाला भारताने पाठिंबा दिला आहे. अशा दुबळ्या ठरावाला भारताने कसा पाठिंबा दिला, याचेच आश्चर्य वाटते, अशी प्रतिक्रिया द्रमुकच्या संसदीय पक्षाचे नेते टी.आर. बालू यांनी दिली आहे.

तामिळनाडूत जोरदार निदर्शने- श्रीलंकेतील तामिळींवर होणा-या अन्यायाविरुद्ध तामिळनाडूतील विद्यार्थ्यांनी गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन केले. चेन्नईसह ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. नागपट्टीनम जिल्ह्यात मच्छिमारांनी भर समुद्रात उपोषणाला सुरुवात केली आहे. चेन्नईत केंद्रीय पी. चिदंबरम यांच्या निवासस्थानाकडे जाण्याचा प्रयत्न करणा-या 500 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. श्रीलंकेच्या उपउच्चायुक्त कार्यालयाकडे जाणा-या विद्यार्थ्यांच्या एका गटालाही अटक करण्यात आली. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक (एटीएनके) च्या कार्यालयाच्या लष्करी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. कोइम्बतूरमध्ये एमडीएमकेच्या सुमारे 1000 महिलांनी उपोषण केले.