आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

इराकची अनेक शहरे बंडखोरांच्या ताब्यात, आयएसआयएलला नेमके काय हवे?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बगदाद - सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या सिरिया सीमेनजीक चढाई करून सुन्नी दहशतवाद्यांनी रविवारी पश्चिमेकडील अनेक शहरांवर जोरदार चढाई करून त्यावर कब्जा केला आहे. त्यात इराकी सैन्याचा पाडाव झाला. दुसरीकडे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी इराकच्या दौर्‍यावर दाखल झाले.

अल-कैम शहरावर शनिवारी ताबा मिळवल्यानंतर रविवारी आयएसआयएल संघटनेच्या दहशतवाद्यांनी रावा आणि अना शहरांवर कब्जा केला. या वेळी सरकारी सुरक्षा दलाकडून मात्र या शहरातून तांत्रिकदृष्ट्या माघार घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ही दोन्ही शहरे सिरियानजीक असलेल्या सामरिक मार्गाजवळील आहेत. त्यामुळे दोन्ही शहरांवरील ताब्यामुळे सिरिया सरहद्दीजवळील परिसरदेखील दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखाली आला आहे. त्याचा धोका सिरियालाही असल्याने तणावाच्या परिस्थितीत वाढ झाली आहे. अनबर या वाळवंटी प्रदेशावर बंडखोरांनी अगोदरच चढाई केली होती. हादेखील सिरिया सीमेजवळील प्रदेश आहे. पूर्व तिक्रित भागातील अल-अलाममध्ये अदिवासी, सुरक्षा दल आणि बंडखोर यांच्यात जोरदार धुमश्चक्री उडाल्याचे पाहायला मिळाले. शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला संघर्ष रविवारी रात्रीपर्यंत सुरूच होता.

तिक्रितमध्ये हवाई हल्ला
बंडखोरांवरील कारवाईत वाढ करण्यासाठी इराक सरकारने रविवारी तिक्रित शहरातील बंडखोरांच्या तळावर हवाई हल्ला केला. त्यात किमान सात जण ठार झाले. दुर्दैवाने हा हल्ला नागरी वस्तीमध्ये झाला.

एकजुटीवर भर
देशात यादवी पेटलेली असतानाच त्यावर राजकीय फुंकर घालण्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री जॉन केरी रविवारी कैरोमध्ये दाखल झाले. मध्य-पूर्व, युरोपच्या दौर्‍यावर ते आहेत. इराकमधील विविध गटातटांतील नेत्यांनी एकत्र येऊन देश वाचवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे.
त्यासाठी मतभेद विसरून एकजूट करण्यासाठी केरी यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जातो.

अमेरिकेची भूमिका काय?
इराकमधील प्रश्न सोडवण्यासाठी अरब देशांकडून दबाव आला पाहिजे, असे अमेरिकेला वाटते. अशा दबावानंतरच देशात तत्काळ सरकारची स्थापना होईल. पंतप्रधान नुरी अल-मलिकी यांनी पद सोडावे, असे पूर्वी सातत्याने म्हणणार्‍या अमेरिकेने आता मात्र जनतेनेच आपला नेता निवडावा, अशी भूमिका घेतली आहे. लोकशाहीची स्थापना करण्यासाठी आम्ही इराकला एक संधी दिली आहे. त्यांनी आपली मुले व त्यांच्या भविष्यासाठी योग्य दिशेने गेले पाहिजे, असे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केले.

आयएसआयएलला नेमके काय हवे?
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड लेव्हंट संघटनेचा (आयएसआयएल) इराक आणि सिरिया ही इस्लामिक राष्ट्रे झाली पाहिजेत, असा मनसुबा आहे. त्यासाठी त्यांनी बंडखोरी करून आपल्याच देशाच्या विरोधात हिंसाचार सुरू केला आहे.

103 भारतीय अडकले
नवी दिल्ली - भारतीयांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. सरकार सातत्याने इंटरनॅशनल रेड क्रेसेंटच्या संपर्कात आहे. या यंत्रणेकडून 39 भारतीयांच्या सुटकेसाठी मदत देऊ करण्यात आली आहे. मोसूलमध्ये या भारतीय कामगारांचे अपहरण झाले होते. एकूण 40 जणांचे अपहरण झाले होते. यातील एकाची सुखरूप सुटका झाली. अजूनही 103 भारतीय हिंसाचार असलेल्या भागात अडकलेले आहेत.