आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Still Now Pak Military With Me, Parvez Mushraff Claim

पाक लष्कर अजूनही माझ्यासोबत, परवेझ मुशर्रफ यांचा दावा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती व लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होण्याचे संकेत देत पाकिस्तानी लष्कर अद्यापही माझ्याच मागे असल्याचा दावा ठोकला आहे. पाकिस्तानी लष्कराने आपली साथ सोडून दिल्याचा दावा मुळापासून खोडून काढत त्यांनी पाक लष्करातील 6.5 लाख सैनिक अजूनही माझ्यासोबतच आहेत, असा दावा केला आहे.
माजी राष्‍ट्रपती मुशर्रफ यांनी सांगितले की, आपण लष्कराचे नेतृत्व ब्रिगेडियर व प्रमुख या नात्याने केले आहे. एक लीडर किंवा कमांडर म्हणून नाही. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी हा दावा केला. पुढे बोलताना मुशर्रफ म्हणाले की, ‘खरेखुरे नेतृत्व तेव्हाच सिद्ध होते, जेव्हा तुम्ही कुठल्याही पदावर नसता. तुमच्या अंगावर असलेली वर्दी काढून बघा लोक तुमचे म्हणणे कितपत ऐकतात किंवा ते तुमच्या मागे आहेत किंवा नाही हे तुम्हाला समजून येईल.’
मुशर्रफ यांनी असा दावा केला की, ‘पाक लष्करातील सुमारे 6.5 लाख सैनिकांनी माझी साथ कधीच सोडलेली नाही. ते कालही माझ्या मागे होते आणि आजही आपल्यासोबत आहेत.’ पाक सरकारतर्फे मुशर्रफ यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात येत आहे. सरकारच्या या कृतीबाबत बोलताना ते म्हणाले, या कारवाईतून राजकारणाचा उग्र वास येतो. आपल्यावरील कारवाईमुळे पूर्ण लष्कर निराश आहे. आपल्याला त्याबाबत कोणतीच शंका नाही. मला मिळालेल्या प्रतिक्रियांनुसार पाक लष्कर अजूनही माझ्यासोबतच आहे. नवाझ शरीफ सरकारने मुशर्रफ यांच्यावरील देशद्रोहाचा खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालय गठित केले आहे. 1999 मध्ये शरीफ यांना पदच्यूत करून मुशर्रफ यांनी देशाची सूत्रे हाती घेतली होती.2008 पर्यंत ते राष्‍ट्रपती व लष्करप्रमुख म्हणून पदावर कायम होते.
नववर्षदिनी कोर्टात हजर व्हावे लागणार
मुशर्रफ यांच्यावर सुरू असलेल्या देशद्रोहाच्या खटल्यात त्यांना 1 जानेवारी 2014 रोजी विशेष न्यायालयासमोर हजर व्हावे लागणार आहे. पाकिस्तानात 2007 मध्ये आणीबाणी लागू केल्याप्रकरणी तसेच पाकची राज्यघटना बरखास्त केल्याप्रकरणी परवेझ यांच्यावर देशद्रेहाचा खटला चालवण्यात येत आहे. पाकमधील निवडणुकीआधी परवेझ मुशर्रफ मायदेशी परतले होते. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली होती. अनेक महिने ते तुरुंगातच होते. गेल्या महिन्यात त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर मुशर्रफ पाकच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी पुन्हा धडपड करत आहेत.