आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Strengthening Parliament Only Way Forward: Pakistan Pm ‎

पाकमध्ये मुदतपूर्व निवडणुकीचे संकेत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - पाकिस्तानी लोकशाहीसमोरील आव्हाने पाहता संसद बळकट करण्यासाठी मुक्त आणि नि:पक्ष वातावरणात निवडणुका हाच एकमेव मार्ग आहे. निवडणुका आता फार दूर नाहीत, असे प्रतिपादन पंतप्रधान राजा परवेझ अशरफ यांनी केले आहे. सर्वोच्च न्यायालय आणि सरकारमधील तणावाचे संबंध पाहता अशरफ यांनी केलेले विधान म्हणजे मुदतपूर्व निवडणुकांचे संकेत मानले जात आहेत.
प्रसारमाध्यमे आणि न्यायसंस्था आता स्वायत्त झाल्या आहेत.संसदेलाही तोच दर्जा मिळण्याची ही वेळ आहे. पुढील सार्वत्रिक निवडणूक स्वतंत्र, स्वायत्त निवडणूक आयोगाच्या निगराणीखाली होतील, असे अशरफ म्हणाले. रमजाननिमित्त अशरफ यांनी सोमवारी रात्री जंगी इफ्तार पार्टी दिली. पंतप्रधापदी विराजमान झाल्यानंतर प्रथमच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारींच्या खटल्यावरून पाकिस्तान सरकार आणि सर्वोच्च न्यायालय यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. झरदारींविरुद्ध खटला दाखल करण्यासाठी न्यायालयाने लकडा लावला असून सत्ताधारी पाकिस्तानी पीपल्स पार्टीने त्यास वारंवार नकार दिला आहे. याप्रकरणी उद्या बुधवारी अशरफ न्यायालयात सरकारची बाजू मांडणार आहेत. त्यांनी झरदारींवर खटला भरण्यास नकार दिल्यास अशरफ यांनाही माजी पंतप्रधान गिलानींप्रमाणे अपात्र ठरवले जाण्याचा धोका आहे. न्यायसंस्था व सरकार यांच्यात तिढा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर अशरफ म्हणाले, सरकार निवडण्याचा हक्क केवळ जनतेला आहे. त्यामुळे जनतेला तिच्या आवडीचे सरकार निवडून आणण्याची मुभा द्या. लष्कर, न्यायसंस्था असो वा सरकार, शेवटी देशासाठी सर्वांनीच एकत्रितपणे काम केले पाहिजे. निर्धारित कालावधीनुसार पाकिस्तानात पुढील वर्षी म्हणजे सन 2013 च्या मार्च-एप्रिल महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अशरफ यांना पत्रकारांनी खोदून खोदून विचारले असता निवडणुका फार दूर नाहीत, असे त्यांनी सूचित केले. दरम्यान, न्यायालयात उद्या काय बाजू मांडणार याविषयी चकार शब्दही त्यांनी काढला नाही.
निवडणूक हाच पर्याय - संसदेच्या बळकटीसाठी निवडणूक हाच पर्याय सरकार निवडण्याचा हक्क जनतेलाच. - राजा परवेझ अशरफ, पंतप्रधान