आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Study Finds That Avoiding Lies Can Improve Your Health

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किमान खोटे बोला; आरोग्य सुधारा!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - थोडेसे खोटे बोलल्याने कुणीही दुखावले जाणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल तर पुन्हा विचार करा! खोटे बोलण्याची सवय कमी करून खरे बोलायला शिकल्यास मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते, असा दावा नॉटॅडॅम विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे.
खोटे बोलल्यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर नेमका कोणता परिणाम होतो, याचा शोध घेण्यासाठी संशोधकांनी व्यक्तींच्या एका गटावर प्रयोग केला. तद्दन खोटे बोलण्याची सवय असलेल्या लोकांना हेतुत: खरे बोलायला लावण्यात आले असता त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यात कमालीची सुधारणा झाल्याचे आढळून आले आहे, असे मुख्य संशोधक अनिता केली यांनी सांगितले.
शास्त्रज्ञांनी 110 लोकांवर सलग 10 आठवडे ‘सत्याचे प्रयोग’ केले. त्यापैकी 33 टक्के लोक वयस्क होते तर 66 टक्के महाविद्यालयीन तरुण होते. 18 ते 71 वयोगटातील समूहावर करण्यात आलेल्या सत्याच्या प्रयोगाचे परिणाम अत्यंत मनोरंजक असल्याचे आढळून आले. या प्रयोगात सहभागी झालेल्या अर्ध्याअधिक लोकांना 10 आठवडे थोडेही खोटे बोलायचे नाही, अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. उर्वरित अर्ध्या लोकांना मात्र खोटे बोलण्याबाबत कोणत्याही विशेष सूचना देण्यात आल्या नव्हत्या. या दोन्ही गटातील लोकांनी एका आठवड्यात किती खोटारडेपणा केला याची तपासणी करण्यासाठी त्यांची पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली. सलग दहा आठवड्यानंतर या सत्याच्या प्रयोगाचे निष्कर्ष तपासण्यात आले. कमीत कमी खोटे बोलण्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यात सुधारणा होण्याशी थेट संबंध असल्याचे त्यात आढळून आले.
दुहेरी फायदा - ज्या लोकांनी कमीत कमी खोटे बोलण्याचा प्रयत्न केला त्यांचे वैयक्तिक संबंध सुधारल्याचे तसेच त्यांचे सामाजिक व्यवहारही अगदी सहजतेने सुरळीत पार पडल्याचे आढळून आले. सामाजिक आणि वैयक्तिक संबंधांमध्ये झालेल्या या सुधारणेचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यात होतो. - अनिता केली, मुख्य संशोधक