आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Syria Case Serious, But Attack Opposes From America

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सिरिया प्रकरण सिरियस, पण हल्ल्यास अमेरिकेतूनच विरोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - सिरियावर लष्करी कारवाई करण्यासाठी दबाव वाढत आहे. मात्र, अमेरिकेमध्येच त्याला मोठा विरोध होत आहे. राष्‍ट्राध्यक्ष ओबामा यांनी हल्ल्याआधी काँग्रेसची (संसद) मंजुरी घ्यावी. याचा अमेरिकेला काय फायदा होणार याची माहिती द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टीच्या खासदारांनी केली आहे.


दुसरीकडे ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी हल्ल्यासाठी सुरक्षा परिषदेची मंजुरी घेण्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. तो बुधवारी (भारतीय वेळेनुसार गुरुवारी) सादर केला जाईल. संयुक्त राष्‍ट्राच्या बहुतांश कायम सदस्यांनी सिरियावरील लष्करी कारवाईला विरोध केला आहे. मात्र, अमेरिका व अन्य पाश्चिमात्त्य देश हल्ल्यासाठी वचनबद्ध आहेत. लष्करी कारवाईला मंजुरी देणा-या कोणत्याही प्रस्तावावर व्हेटोचा वापर करू, असे रशिया व चीनने म्हटले आहे. फ्रान्सचे राष्‍ट्राध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांनी सिरियातील बंडखोरांना पाठिंबा व सहकार्य कायम ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला.


इराण आणि इस्रायल : अमेरिका सिरियावर हल्ला करणार असेल तर आम्ही इस्रायलवर हल्ला करू, असे इराणने म्हटले आहे. त्यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी म्हटले की, इस्रायल सिरियातील संघर्षात सहभागी नाही. आपल्या हितसंबंधाला ठेच पोहोचल्यास आम्ही तसेच उत्तर देऊ.


दोस्त राष्‍ट्रांची तयारी पूर्ण; हल्ल्यासाठी आजचा मुहूर्त ?
इराक, अफगाणिस्तान युद्धामुळे जनता त्रस्त
गेल्या एक दशकापासूनच्या इराक व अफगाणिस्तान युद्धामुळे अमेरिका जनता त्रस्त आहे. एका सर्वेक्षणानुसार, सिरियावर हल्ला करू नये, असे 60 टक्के लोकांचे म्हणणे आहे. रॉयटर वृत्तसंस्था व बाजाराचा अभ्यास करणारी कंपनी इप्सोसने सर्वेक्षण केले आहे. यामध्ये सिरियावरील अमेरिकी हस्तक्षेपास केवळ 9 टक्के नागरिकांनी पाठिंबा दर्शवला. 60 टक्के लोकांनी त्यास विरोध केला.


अरब लीगचा विरोध
सिरियाचे राष्‍ट्राध्यक्ष असद यांनी केलेल्या रासायनिक हल्ल्याचा अरब लीगने निषेध केला आहे. मात्र, सिरियावरील हल्ल्याबाबत पाश्चिमात्त्य देशांचे समर्थन करण्यास नकार दिला. संयुक्त राष्‍ट्राच्या मंजुरीशिवाय सिरियावर हल्ला करण्याचा देशांना अधिकार आहे, असे ऑस्ट्रेलियाचे परराष्टÑमंत्री बॉब कार यांनी म्हटले आहे.


वृत्तवाहिनीचा दावा
अमेरिकेच्या ‘एनबीसी’ वृत्तवाहिनीने सिरियावर शक्य तितक्या लवकर म्हणजे उद्या गुरुवारीच हल्ला होऊ शकतो, असे वृत्त वॉशिंग्टनमधील अधिका-यांच्या हवाल्याने दिले आहे. लष्करी ठिकाणांवर हा हल्ला होऊ शकतो.
रशियाचा कडाडून विरोध रासायनिक हल्ल्यामागे असाद सरकारचा हात नसून लष्करी कारवाई केल्यास मध्यपूर्वेत अस्थिरता निर्माण होईल, असा इशारा रशियाने दिला आहे. पाश्चात्त्य देश व रशिया यांच्यातील संबंध तणावपूर्ण बनले आहेत.


ओबामांचा अद्याप निर्णय नाही : व्हाइट हाऊस
अमेरिकी राष्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी सिरियावरील हल्ल्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. आता कोणती कारवाई केली जाईल हे स्पष्ट नाही. गुरुवारी व्हाइट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात ही माहिती दिली.


न्यूयॉर्क टाइम्स, ट्विटर हॅक
सिरिया सरकार समर्थक गटांनी मंगळवारी न्यूयॉर्क टाइम्स, ट्विटर आणि हफिंग्टन पोस्टच्या वेबसाइट्स हॅक केल्या. हॅकर्सनी स्वत:ला सिरियन इलेक्ट्रॉनिक आर्मी म्हणवून घेत राष्‍ट्राध्यक्ष असद यांना पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.