आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिरियाकडे रासायनिक अस्त्रे; अमेरिकेला भीती

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फनोम पेन्ह- देशातील रासायनिक अस्त्रावरून अगोदरच भीती व्यक्त करणार्‍या अमेरिकेने शुक्रवारी इशारा दिला. ही घातक अस्त्रे सुरक्षित राहिली नसून साठा असलेल्या ठिकाणाहून बाहेर गेली आहेत. त्यातून देशातील जनतेला धोका निर्माण झाला तर त्याला सिरियन सरकार जबाबदार राहील, असे अमेरिकेने म्हटले आहे.
सिरियाकडे रासायनिक अस्त्र साठा आहे. त्याचा वापर सरकार बंडखोरांविरुद्ध करण्याची शक्यता आहे, अशी भीती अमेरिकेला वाटते. त्यातच काही अस्त्रे बाहेर काढण्यात आल्याची अमेरिकेच्या गुप्तहेर विभागाकडून मिळाली आहे. त्यामुळे अमेरिकेने हा इशारा दिल्याचे ‘द वॉल स्ट्रीट र्जनल’ च्या वृत्तात म्हटले आहे. रासायनिक शस्त्रांचा गैरवापर झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी ही सिरियन सरकारची असेल, असे अमेरिकेच्या गृह खात्याचे प्रवक्ते व्हिक्टोरिया नूलँड यांनी म्हटले आहे. सरिन वायू हा अत्यंत घातक असून तो मोठी प्राणहानी घडवून आणू शकतो. या शिवाय सिरियाकडे मोठा सायनाइड साठादेखील आहे. त्यामुळे अमेरिकेच्या चिंतेत भर पडली आहे. परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन कंबोडियाच्या दौर्‍यावर आहेत. या दरम्यान नॉलंड यांनी हे वक्तव्य केले आहे. सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांच्याविरुद्ध गेल्या मार्च महिन्यापासून असंतोष आहे. या असंतोषाला दडपण्यासाठी असद सरकारच्या लष्कराने केलेल्या हिंसाचारात 17 हजार नागरिकांचा मृत्यू झाला.
200 जणांची हत्या- सिरियन सरकारच्या लष्कराने हमा भागात तोफा व हेलिकॉप्टरचा वापर करून 150 हून अधिक नागरिकांना ठार केल्याचा दावा सिरियातील घडामोडींकडे देखरेख करणार्‍या मानवी हक्कविषयक संस्थेने केला आहे. संस्थेने बंडखोर गटाच्या नेता अबू मोहमद याच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. या घटनेत एकाच गावातील 200 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्या गावावर हा हल्ला झाला. त्या गावाची लोकसंख्या 7 हजार एवढी आहे. हल्ल्यानंतर मात्र गाव ओसाड झाले आहे. सिरियात झालेल्या हिंसाचाराच्या घटनेनंतर कोफी अन्नान यांना धक्का बसला आहे.
अमेरिका व रशिया यांच्यात चर्चा - सिरियातील रासायनिक अस्त्रविषयक चर्चेच्या पार्श्वभूमीवर अमेरिका व रशिया यांच्यातील उच्च लष्करी अधिकार्‍यात शुक्रवारी चर्चा करण्यात आली. क्षेपणास्त्र संरक्षण, सिरियातील बंड आणि त्यामुळे निर्माण झालेल्या तणावावर बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. जनरल मार्टिन डेम्सी व निकोलाई मार्काव्ह यांच्यात ही बैठक झाली. सिरियावर कारवाई करण्याच्या प्रस्तावाला रशियाने विरोध केला आहे. व्हेटोचा वापर करू, असेही रशियाने स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांतील वरिष्ठांची ही बैठक पेन्टागॉन येथे झाली. दोन लष्करी अधिकार्‍यांत अफगाणिस्तानातील युद्ध, मध्य-पूर्वेतील घडामोडी या मुद्दय़ांवरदेखील चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.