आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Syria Crossed Line Of Control, Its Need To Respond This Obama

ओबामा उवाच: सिरियाने लक्ष्मणरेषा ओलांडली त्याला प्रत्त्युतर देणे आवश्यक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्टॉकहोम (स्वीडन ) - सिरियातील रासायनिक हल्ला घृणास्पद आहे.आंतरराष्ट्रीय समुदायाने ठरवलेल्या ‘लक्ष्मणरेषा’च्या मुद्यावर चिकटून राहिले पाहिजे.रासायनिक हल्ल्यास प्रत्त्युत्तर देणे आवश्यक आहे.कारण जगाची विश्वासार्हताच पणाला लागली आहे अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मांडली आहे.
सेंट पीटर्सबर्ग येथील जी-20 परिषदेला रवाना होण्यापूर्वी ओबामा स्वीडनच्या छोटेखानी दौ-यावर गेले आहेत.स्टॉकहोम येथे बोलताना त्यांनी लष्करी कारवाईस समर्थन मिळवण्यासाठी हे आवाहन केले. अमेरिकी काँग्रेसमध्ये मतदान घेण्याच्या निर्णयामुळे आपली विश्वासार्हता पणाला लागली असे वाटत नाही का ?असो खोचक प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ओबामा म्हणाले, माझी नव्हे आंतरराष्ट्रीय समुदायाची विश्वासार्हताच पणाला लागली आहे. कारण आंतररराष्ट्रीय निकष हे महत्त्वाचे आहेत.रासायनिक हल्ल्याविरोधात आंतरराष्ट्रीय समुदायानेच करार केला आहे याची आठवण त्यांनी करून दिली.
दरम्यान, अमेरिकी सिनेटच्या परराष्ट्र व्यवहार समितीकडून ओबामा प्रशासनाला हिरवी झेंडी मिळणार हे निश्चित झाले आहे. मात्र सिरियात घुसून प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी दूरवरूनच हल्ला करा आणि लष्करी कारवाई केवळ 60 दिवसांमध्ये आटोपती घ्या, अशा दोन महत्त्वाच्या अटी समितीने ठेवल्या आहेत.


पुतीन नरमले, पण एकतर्फी
कारवाईस विरोध कायम

सिरियातील असाद सरकारने रासायनिक अस्रांचा वापर केल्याचा ठोस पुरावा असल्यास रशियाही लष्करी कारवाईस पाठिंबा देईल, असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतीन यांनी म्हटले आहे. मात्र कारवाईसाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेचीही संमती हवी, असा त्यांचा आग्रह आहे.
भारत,अमेरिकेसह जगातील अव्वल देशांच्या ‘जी-20’ शिखर परिषदेस उद्या गुरुवारी रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग येथे प्रारंभ होत आहे.त्या निमित्ताने एपी वृत्तसंस्था आणि रशियातील सरकारी उपग्रहवाहिनी ‘चॅनल वन’ पुतीन यांनी खास मुलाखतीत दिली. यावेळी रासायनिक हल्ल्यासाठी असाद सरकारवर आरोप हास्यास्पद असल्याचे ठामपणे सांगितले. मात्र असाद यांच्या लष्करानेच रासायनिक अस्रे वापरली असल्याचे पुरावे असल्यास ते सुरक्षा परिषदेसमोर ठेवा.हे पुरावेही ठोस असले पाहिजेत.तरच रशियाही लष्करी कारवाईसाठी तयार असल्याचे ते म्हणाले.


भारताचे मौन, भाजपचा हल्ला
संयुक्त राष्ट्राला डावलून सिरियावर एकतर्फी हल्ला करण्याची तयारी अमेरिकेने सुरू केली असताना भारताने मौन बाळगल्याबद्दल लोकसभेत भाजप नेते आणि माजी परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली. संयुक्त राष्ट्राला डावलून पाश्चात्त्य राष्ट्रे ‘पोलिसगिरी’ करीत असल्याची टीका करून भारताने त्याला कडाडून विरोध केला पाहिजे, असे ते म्हणाले. शून्य प्रहरात जसवंतसिंह यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांच्यावरही त्यांनी जोरदार टिका केली. ते मनमिळाऊ आहेत पण सक्षम नाही (अफेबल,पण नॉट एबल )असे ते म्हणाले. जसवंतसिहांच्या या मुद्याला विरोधकांकडील अनेक खासदारांनी पाठिंबा दिला.याप्रकरणी परराष्ट्रमंत्री खुर्शीद यांनी निवेदन करावे अशी मागणी भाजप खासदारांनी लावून धरताच खुर्शीद सभागृहातून उठून सरळ बाहेर निघून गेले.