काबूल - पेशावरमध्येशाळेवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्कराने वझिरिस्तानमध्ये तालिबानविरोधी हल्ले वाढवले असून यामुळे बिथरलेल्या दहशतवाद्यांनीही अफगाण पाकिस्तानात कारवाया वाढवल्या आहेत. उत्तर अफगाणिस्तानमध्ये अशाच एका हल्ल्यात दहशतवाद्यांनी सात पोलिसांचे बळी घेतले.
एका अधिका-याने दिलेल्या माहितीनुसार या भयंकर हल्ल्यात इतर पाच पोलिस जवान जखमी झाले असून काही जणांची प्रकृती चिंताजनक आहे. जवझान प्रांतातील कशतेपा जिल्ह्यामधील एका गावामध्ये शनिवारी उशिरा हा हल्ला करण्यात आला. जवझान प्रांताचे मुख्य पोलिस अधिकारी अब्दुल मनान रौफी यांनी याबाबत माहिती दिली. या ठिकाणी अतिरिक्त कुमक पाठवण्यात आल्याचेही रौफी यांनी स्पष्ट केले.
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर या भागात पेटलेल्या धुमश्चक्रीत पोलिसांनी पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याचे रौफी यांनी म्हटले आहे. या महिन्याच्या अखेरीस अफगाणिस्तानमधून पाश्चात्त्य फौजा माघार घेत आहेत.
या पार्श्वभूमीवर देशामधील नव्या सरकारवर दबाव आणण्याच्या मुख्य उद्देशाने केल्या जाणा-या तालिबानी हल्ल्यांच्या तीव्रतेमध्ये अशात वाढ झाली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानातून पाश्चात्य फौजा परतल्यानंतर अफगाण पोलिसांसमोर मोठे आव्हान असेल.