आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Taliban Terrorist Murdered Indian Writer Sushmit Banerjee

तालिबान्यांकडून भारतीय लेखिका सुष्मिता बॅनर्जी यांची घरात घुसून हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काबूल - तालिबानींच्या छळातून नाट्यमय पद्धतीने सुटका करून घेणा-या व बॉलीवूड चित्रपटाची प्रेरणा ठरलेल्या भारतीय लेखिका सुष्मिता बॅनर्जी (49) यांची गुरुवारी अमानुष हत्या झाली. अफगाणिस्तानात सासरच्या घरी असताना तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केली.


पाकतिका प्रांतात अचानक तालिबानी दहशतवाद्यांनी त्यांच्या घरावर हल्लाबोल केला. काही दहशतवाद्यांनी त्यांचे पती, कुटुंबातील इतर सदस्यांना धरून ठेवले. त्यानंतर बॅनर्जी यांना घराच्या बाहेर आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अमानुषपणे गोळ्या झाडण्यात आल्या. कट्टरवादी तालिबानी एवढ्यावरच थांबले नाहीत, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बॅनर्जी यांचा मृतदेह कोणत्याही धार्मिक संस्काराशिवाय जवळच्या धार्मिक शाळेत पुरला. बॅनर्जी यांची हत्या करण्यात आल्यानंतर अद्याप त्याची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी गटाकडून घेण्यात आलेली नाही.


काय आहे प्रकरण ?
सुष्मिता बॅनर्जी या प्रथितयश लेखिका म्हणून परिचित आहेत. त्यांचा विवाह अफगाणिस्तानचे उद्योगपती जांबाझ खान यांच्याशी झाला होता. दोघांची भेट कोलकात्यात झाली. त्यानंतर दोघांनी परस्परांची जोडीदार म्हणून निवड केली होती. त्यानंतर त्या 1989 मध्ये भारत सोडून अफगाणमध्ये गेल्या; परंतु तेथे त्यांना धार्मिक कट्टरवादाचा मुकाबला करावा लागला. तालिबान्यांच्या विरोधात गेल्यामुळे त्यांना अनेक वेळा दहशतवाद्यांकडून धमकी मिळाली होती. त्या पाश्र्वभूमीवर ही घटना घडली आहे. अलीकडेच त्या भारतातून अफगाणमध्ये सासरी परतल्या होत्या.


‘एस्केप फ्रॉम तालिबान’
बॉलीवूडमध्ये 2003 मध्ये तयार झालेला चित्रपट सर्वांच्या स्मरणात आहे. ‘एस्केप फ्रॉम तालिबान’ या चित्रपटात अभिनेत्री मनीषा कोईरालाने सुष्मिता यांची भूमिका वठवली होती. तालिबान्यांच्या तावडीतून एक महिला स्वत:ची कशी सुटका करून घेते, असे कथानक त्यात मांडण्यात आले होते.