आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेहसूदचा मृत्यू पाकच्या जिव्हारी; अमेरिकेशी मैत्रीचा फेरविचार करण्याचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात तालिबानचा म्होरक्या हकिमुल्ला मेहसूदचा खात्मा झाल्यामुळे पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे. अमेरिकेसोबतच्या संबंधांचा फेरविचार करण्याचा इशारा पाकिस्तानने दिला. त्यासाठी रविवारी उशिरा एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

हकिमुल्ला मेहसूदवर अमेरिकेने 50 लाख डॉलर्सचे बक्षीस ठेवले होते. मेहसूदचा माग काढत अमेरिकेच्या मानवरहित विमानाने शुक्रवारी त्याच्यावर हल्ला केला. त्यात तो ठार झाला. ही कारवाई वायव्य वझिरिस्तान भागात यशस्वीरीत्या पूर्ण झाली. हा भाग अफगाण सीमेजवळ येतो. मेहसूदचा खात्मा झाल्याने पाकिस्तान भडकले आहे. म्हणूनच सरकारने उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. तालिबानने जवान आणि निष्पाप नागरिक अशा हजारोंची हत्या केली, तरीदेखील पाकिस्तान सरकारने तालिबानसमोर शांततेच्या वाटाघाटीचा प्रस्ताव ठेवला. वाटाघाटीसाठी प्रयत्न सुरू असतानाच अमेरिकेने मेहसूदला टिपले. त्यामुळे पाकिस्तान सरकार संतापले आहे. अमेरिकेसोबतच्या संबंधांचा फेरविचार करण्याची भाषा रविवारी सरकारी अधिकार्‍यांकडून करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने सायंकाळी उशिरा एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. दुसरीकडे हकिमुल्ला शुक्रवारच्या हल्ल्यात ठार झाला किंवा नाही याबाबत अद्यापही अमेरिकेच्या इस्लामाबादमधील दूतावास कार्यालयाकडून ठामपणे काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही.

सात आठवडे पाण्यात
हकिमुल्लाचा खात्मा झाल्याने प्रयत्न पाण्यात गेले आहेत. तालिबानसोबत आम्ही शांततेसाठी वाटाघाटी सुरू केल्या होत्या. विश्वासाचे नाते निर्माण व्हावे म्हणून एक-एक वीट आम्ही जोडत होतो. सात आठवड्यांपासून आमचे प्रयत्न सुरू होते; परंतु अमेरिकेने मध्येच ही कारवाई केली. आम्ही शांतता नांदावी म्हणून प्रयत्न करत असताना तुम्ही (अमेरिका) हे काय करून ठेवले? असा संतप्त सवाल पाकिस्तानचे गृहमंत्री चौधरी निसार यांनी उपस्थित केला.

बोलणी फिसकटली
मेहसूद ठार झाल्यानंतर शनिवारी तालिबानचे तीन कमांडर आणि पाकिस्तान सरकार यांच्यात बैठक झाली; परंतु मेहसूद ठार झाल्यामुळे शांती चर्चा पुढे जाऊ शकणार नसल्याचे तालिबानने सरकारला स्पष्ट केले. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात साखळी बॉम्बस्फोट करण्याचा इशाराही तालिबानने दिला.

हाक ना बोंब
अमेरिकेने घरात घुसून मेहसूदला ठार केले याचा पाकिस्तानला प्रचंड राग आहे; परंतु अमेरिकेकडून नेहमीच आर्थिक मदत मिळत असल्याने त्या उपकाराखाली दबलेल्या पाकिस्तानला सार्वभौमत्वाला आव्हान मिळत असतानाही दाद मागता येत नाही किंवा अमेरिकेच्या नावाने शिमगाही करता येत नाही, असे चित्र आहे.
संबंध अनेक वेळा ताणले : अमेरिका-पाकिस्तान यांच्यातील संबंध गेल्या काही वर्षांत अनेक वेळा ताणले गेल्याचे दिसून आले आहे. 2011 मध्ये अमेरिकेच्या कमांडोंनी अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. तेव्हाही पाकिस्तानने तोडण्याची भाषा वापरली होती.

नेटवर्कचा वापर
तालिबानसोबतची शांतता चर्चा फिसकटण्यामागे अमेरिकेची कारवाई कारणीभूत असल्याचा ठपका ठेवणार्‍या पाकिस्तानला महासत्तेने चोख उत्तर दिले आहे. तालिबान आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनांत संबंध होते. अल-कायदाचे जगात नेटवर्क आहे. तालिबान करते, असे इस्लामाबाद राजदूत कार्यालयातील प्रवक्ते संदीप पॉल यांनी म्हटले आहे.

कट फसला
तेहरिक-ए-तालिबानचा म्होरक्या हकिमुल्ला मेहसूदने टाइम्स स्क्वेअरवर 1 मे 2010 मध्ये दहशतवादी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता; परंतु तो हल्ला अयशस्वी ठरला होता. अशा अनेक हल्ल्यांमागे तालिबानचा हात होता. हकिमुल्लाने हातमिळवणी केल्यानेच अल-कायदासाठी पाकिस्तानी प्रदेश म्हणजे नंदनवन बनले, असे अमेरिकेने म्हटले आहे.