आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ला : कामरा विमानतळ लक्ष्य, 10 दहशतवादी ठार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- लष्करी पोशाखात आलेल्या अतिरेक्यांनी गुरुवारी पहाटे कामरा हवाई तळावर हल्ला चढवला. या वेळी सुरक्षा जवान आणि अतिरेक्यांमध्ये उडालेल्या चकमकीत सात अतिरेकी व 1 जवान ठार झाला. चकमकीनंतर या परिसरातील काही भागाला आग लागली.
कामरा इवाई तळाच्या प्रवेशद्वारातील तीन अडथळे पार करत स्वयंचलित शस्त्रसज्ज बंदूकधार्‍या अतिरेक्यांनी गुरुवारी पहाटे 2 वाजता आतमध्ये प्रवेश मिळवला. या परिसरातील एफ 16 आणि जेएफ 17 लढाऊ विमानांवर हल्ला चढवण्याचा त्यांचा उद्देश होता, असे सांगितले जाते. पाकिस्तानी अण्वस्त्रे अतिरेक्यांच्या हातात पडण्याचा धोका असल्याचे वक्तव्य अमेरिकेच्या संरक्षणमंत्री लियोन पनेट्टा यांनी बुधवारी केले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी हा हल्ला झाला. याच ठिकाणी पाकने 100 अण्वस्त्रे ठेवल्याचे मानले जाते. कामरा पाकिस्तानातील सर्वांत मोठा हवाई तळ आहे. अतिरेक्यांनी रॉकेट ग्रेनेडद्वारे केलेल्या हल्ल्यात एका विमानाचे नुकसान झाल्याचे टीव्ही वाहिन्यांच्या वृत्तात म्हटले आहे. अतिरेक्यांचा हल्ला परतावून लावण्यासाठी सुरक्षा जवानांनी आठ तास शर्थीचे प्रयत्न केले. या कारवाईत 7 अतिरेकी व 1 जवान ठार झाला. हवाई तळाचे कमांडर व प्रवक्ते मुहंमद आझम यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली. यादरम्यान अतिरेक्यांची एक गोळी त्यांना लागली, मात्र आपली प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे ते म्हणाले. अतिरेक्यांविरोधातील कारवाई संपुष्टात आली आहे, मात्र आतमध्ये काही अतिरेकी राहिलेत का, याची शक्यता पडताळण्यासाठी परिसर पिंजून काढला जात आहे, अशी आझम यांनी दिली.
पाकिस्तानचे लष्करप्रमुख अशरफ परवेज कयानी यांनी दोन दिवसांपूर्वी अतिरेक्यांविरुद्ध मोहीम उघडण्याची घोषणा केली होती. उत्तर वजिरिस्तानातील हक्कानी गटाविरुद्ध हा इशारा असल्याचे मानले जाते. या वक्तव्यानंतर हा हल्ला झाला आहे. हवाई तळावर ईदपूर्वी हल्ला होऊ शकतो, असा इशारा एक्स्प्रेस ट्रिब्युनच्या वृत्तात दिला होता.
आधीही झाले हल्ले- पाक अतिरेक्यांनी याआधीही लष्करी तळांवर हल्ले चढवले आहेत. मे 2011 मध्ये मेहरान येथील हवाई तळावर हल्ला करण्यात आला. यामध्ये 10 जवान ठार झाले होते. या ठिकाणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पाक लष्कराला त्या वेळी 17 तास झगडावे लागले होते. 2009 मध्ये कामरा लष्करी चौकीवर झालेल्या हल्ल्यात किमान सहा जण ठार झाले होते. डिसेंबर 2007 मध्ये कामरा येथील एका शाळेवर झालेल्या हल्ल्यात पाच मुले ठार झाली. ही मुले लष्करी कर्मचार्‍यांची होती.
लढाऊ विमानांचे भांडार- कामरा हवाई तळावर एफ 16 आणि जेएफ 17 लढाऊ विमाने ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येते. लढाऊ विमानांची संख्या मात्र स्पष्ट होऊ शकली नाही. लष्करी तळानजीकच्या पिंद सुलेमान मखान गावातून अतिरेक्यांनी प्रवेश केल्याचे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. पाकिस्तान तालिबानने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे बीबीसीच्या वृत्तात म्हटले आहे.
पाकिस्तान - दहशतवद्यांच्या हल्ल्यात चार पोलिसांचा मृत्यू
पाकिस्तान - अफगाण सीमेजवळ स्फोटात 14 जणांचा मृत्यू
अमेरिकेला आव्हान; ड्रोन क्षेपणास्त्रावर मात करू शकतो पाकिस्तान !