दहशतवाद्यांचे बस्तान आता / दहशतवाद्यांचे बस्तान आता उत्तर आफ्रिकेत

वृत्तसंस्था

Dec 26,2011 11:42:10 PM IST

लंडन - उत्तर आफ्रिका लवकरच दहशतवाद्यांचे नंदनवन होण्याची शक्यता आहे. कारण पाकिस्तान, अफगाणिस्तानात प्रतिकूल परिस्थिती असल्याने अल-कायदाचे म्होरके आपले बस्तान उत्तर आफ्रिकेत हलवण्याची शक्यता आहे, असा इशारा एका वरिष्ठ ब्रिटिश अधिका-याने दिला आहे.
पाकिस्तान, अफगाणिस्तान हे देश दहशतवाद्यांसाठी अनेक वर्षे नंदनवनासारखे होते, परंतु आता अमेरिका, नाटो यांच्या वाढत्या लष्करी कारवाया यामुळे दहशतवादी त्रस्त झाले असावेत. त्यामुळेच अल-कायदाच्या दोन म्होरक्यांनी अगोदरच दोन्ही देश सोडून लिबिया गाठले आहे. म्हणूनच त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून दहशतवादी संघटनेचे अन्य कमांडर देखील येत्या काही महिन्यांत उत्तर आफ्रिकेच्या दिशेने जाण्याची भीती आहे, असे एका वरिष्ठ ब्रिटिश अधिका-याच्या हवाल्याने दी गार्डियन या वृत्तपत्राने म्हटले आहे.
अफगाणिस्तानच्या ईशान्येकडील कुनार भागात असलेला तळ सोडून अल-कायदाचे दोन कमांडर अलीकडेच निघून गेले आहेत. वास्तविक हे दोन कमांडर अनेक वर्षांपासून येथे होते, परंतु त्यांनी असुरक्षेच्या कारणावरून हा भाग सोडल्याचे सूत्रांनी सांगितले.
अल-कायदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनवर अबोटाबादमध्ये झालेल्या कारवाईनंतर दहशतवाद्यांना चांगलाच धक्का बसल्याचे मानले जाते. मे महिन्यातील घटनेनंतरही अनेक कारवाया झाल्या. त्यात अल-कायदाचे वरिष्ठ पातळीवरील कमांडर ठार झाले होते. दहशतवादी आपला मुक्काम नक्की उत्तर आफ्रिकेत करतील किंवा पश्चिम आशियात जातील, याची नेमकी माहिती मिळाली नाही, परंतु बस्तान हलवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत ब्रिटिश परराष्ट्र
सचिव विल्यम हेग यांनी अलीकडेच इशारा दिला होता.
ड्रोनने उडवली भंबेरी - दहशतवाद्यांची भंबेरी उडू शकत नाही. ते जिवावर उदार असतात. वगैरे गोष्टी नेहमीच ऐकायला मिळतात, परंतु काही दिवसांपूर्वी पाकिस्तान व अफगाणिस्तान भागात अमेरिकेने मानवरहित विमानांच्या साह्याने हल्ले केले होते. या हल्ल्यात अल-कायदाच्या एका अनुभवी कमांडरचा खात्मा झाला होता. या घटनेची धास्ती दहशतवाद्यांनी घेतली असावी. भविष्यात ड्रोन हल्ले झाले तर वाचणार नाहीत. कथित जिहादच्या उच्चाटनाच्या भीतीने त्यांनी हा निर्णय असावा.
लास्ट पुश - अल-कायदासह दहशतवाद्यांच्या उच्चटनासाठी अमेरिकेसह आंतरराष्ट्रीय समुदाय जोरदारपणे प्रयत्न करत आहे. त्याचा परिणाम म्हणून मे 2011 मधील कारवाई दिसून आली. त्यात लादेनचा खात्मा करण्यात यश आले. आता अल-कायदाची उर्वरित ताकदही संपवण्यासाठी 2012 मध्ये कारवायाचा धडाका लावून ही दहशतवादी संघटना निश्चितपणे संपवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या लास्ट पुशची कल्पनाही दहशतवाद्यांना आल्याने ते मुक्काम हलवण्याचा प्रयत्न करू शकतात.

X
COMMENT