आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थायलंडची संसद बरखास्त; माजी पंतप्रधान यिंगलूक नजरकैदेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बँकॉक- लष्कराने शनिवारी थायलंडची संसद बरखास्त केली. त्याच बरोबर माजी पंतप्रधान यिंगलूक शिनवात्रा यांच्यासह देशातील बड्या नेत्यांना लष्कराने नजरकैदेत ठेवले आहे. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील 35 जणांची धरपकड करण्यात आली आहे. सर्व नेत्यांना आठवडाभर तरी अशा स्थितीत राहावे लागेल. देशात लष्करी राजवट लागू करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

गुरुवारी देशावर नियंत्रण मिळवल्यानंतर पहिल्यांदाच घेतलेल्या पत्रकार परिषदेत लष्कराने यिंगलूक यांच्यासह 155 नेत्यांविषयी माहिती दिली. सर्व नेते सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले; परंतु त्यांना नेमके कोठे ठेवण्यात आले आहे, याविषयी मात्र बोलण्यास नकार देण्यात आला. त्यांना आठवडाभर ठेवण्यात येईल. त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. थायलंडमधील राजकीय संघर्षात त्यांचा प्रत्यक्षपणे कसा सहभाग होता, याचा तपास करण्यात येत असल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल विनठाई सुवारी यांनी दिली.

सर्व राजकीय नेत्यांना चांगल्या प्रकारे वागणूक देण्यात येत असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. शुक्रवारी दीडशेहून अधिक जणांना बोलावण्यात आले होते. शनिवारी राजकीय कायकर्ते शिक्षणतज्ज्ञ अशा एकूण 35 जणांना लष्कराने ताब्यात घेतले आहे. देशातील शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अटक करण्यात आल्याची मखलाशी लष्कराने केली आहे. दरम्यान, देशाने 12 वेळा लष्करी राजवटीचा अनुभव घेतला आहे. 2006 मध्ये देशाने शेवटचा लष्करशहा पाहिला होता. गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून देशाची वाटचाल अस्थिरतेकडे सुरू झाली होती. तांदळाच्या अनुदानातील भ्रष्टाचाराचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आल्यानंतर त्यांना सत्ता सोडावी लागली होती.
पंतप्रधानपदी नियुक्ती
लष्करप्रमुख प्रयुथ चान-ओछा यांनी स्वत:ची देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे. ओछा यांनी शुक्रवारी अनेक सरकारी अधिकारी, राज्यपाल आणि विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींची भेट घेतली होती. देशातील राजकीय अस्थिरता निवडणुकीपूर्वी संपुष्टात यायला हवी, असे 60 वर्षीय ओछा यांनी म्हटले आहे.