आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचाळपणा करण्याऐवजी मोदींनी यशाचा विचार करावा, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चा सल्ला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन - भारताला भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची गरज आहे, असे अमेरिकी वृत्तपत्र ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने म्हटले आहे. कौतुक करतानाच वृत्तपत्राने मोदींना पूर्वग्रह ठेवून वाचाळपणा करण्यापेक्षा आपण यशस्वी कसे होऊ यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्लादेखील दिला आहे. धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या टीकेकडे दुर्लक्ष करून वृत्तपत्राने मोदींनी आता ‘मुस्लिमविरोधी’ वाचाळपणा सोडल्याचे नमूद केले. मोदींचे सरकार आल्यानंतर लोकशाही संस्था दुबळ्या होतील किंवा धार्मिक उन्माद वाढेल, असा तर्क वृत्तपत्राने फेटाळला. भारताची राजकीय संस्कृती अशा प्रकारच्या नक्षलवादास रोखण्यास सक्षम आहे. मोदींविषयी काहीही शंका असण्याचे कारण नाही. 1998 मध्ये भाजपने पहिल्यांदा सरकार स्थापन केले होते. त्या वेळीदेखील अशाच प्रकारच्या शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या, असे वृत्तपत्राने म्हटले आहे.
मनमोहन सरकारमुळे डबघाईला
मोदी यांचा करिश्मा कायम असून ते कठोर पर्शिम घेणारे आहेत, असे द वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. त्यामुळे ते देशात मोठे परिवर्तन आणू शकतात. गेल्या दहा वर्षांत काँग्रेसच्या मनमोहनसिंग सरकारने प्रभावशून्य नेतृत्व दिले. त्यामुळे सरकार डबघाईला आले.
ओबामा प्रशासनाकडून मैत्रीचा हात पुढे करणे कौतुकास्पद
ओबामा प्रशासनाकडून मोदींना मैत्रीचा हात पुढे करण्यात आला आहे. ही प्रशंसनीय बाब आहे, असे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे. मोदी धार्मिक भेदभावाला चिथावणी देण्याऐवजी अर्थव्यवस्थेला पुढे नेण्याचे काम करतील, अशी अपेक्षा करणे गैर नाही.
उणिवांपेक्षा सकारात्मक पैलू
द वॉशिंग्टन पोस्टने मोदींच्या सर्व उणिवांचा पाढा वाचला आहे. सोबतच त्यांच्यात सकारात्मक पैलू अधिक असल्याचेही म्हटले आहे. मोदींच्या ‘पहिल्यांदा शौचालय, नंतर देवालय’ या वक्तव्याचा उल्लेख करून त्यांनी धार्मिक किंवा मुस्लिमविरोधी भूमिका सोडल्याचे स्पष्ट झाले आहे, असे वृत्तपत्राचे म्हणणे आहे.
मोदी इतिहास घडवतील : अडवाणी
तिरुवनंतपुरम. भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी यांची मंगळवारी तिरुवनंतपुरम येथे सभा झाली. ते म्हणाले, 2014 मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी नवीन इतिहास लिहितील. या निवडणुकीत रालोआ 272 हून अधिक जागी विजयी होईल. या निवडणुकीमुळे देशात आमूलाग्र परिवर्तन होईल. राजगोपालदेखील या वेळी निवडणूक जिंकून इतिहास घडवतील. राजगोपाल यांच्या विजयामुळे राज्यातील राजकारणाचे ध्रुवीकरण होईल. वृत्तपत्रांतील बातम्यांच्या हवाल्याने अडवाणी म्हणाले, पंतप्रधान नवीन घराच्या शोधात आहेत. निवडणुकीतील पाहणीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असे म्हटले आहे.