आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परवेझ मुशर्रफ यांचा तिसरा उमेदवारी अर्ज मंजूर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - माजी लष्करप्रमुख व हुकूमशहा परवेझ मुशर्रफ यांच्या सक्रिय राजकारणाच्या मार्गातील पहिला अडथळा दूर झाला आहे. दोन मतदारसंघात उमेदवारी अर्ज फेटाळल्यानंतर खैबर पख्तुनख्वा प्रांतातील चित्राल मतदारसंघात त्यांचा अर्ज मंजूर करण्यात आला.

कराची संसदीय मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले जमात-ए-इस्लामीचे नेते नियामुतुल्हा खान यांनी मुशर्रफ यांच्या उमेदवारीवर शनिवारी आक्षेप घेतला. 2007 मध्ये न्यायमूर्तींना नजरकैदेत ठेवले व आणीबाणी लागू करून त्यांनी घटनेचे उल्लंघन केल्याचा आक्षेप खान यांनी घेतला होता. मुशर्रफ यांनी न्यायसंस्थेच्या विरोधात काम करणाºया व्यक्तीविरुद्ध कारवाई केलेली कागदपत्रे सादर केली. मात्र, निवडणूक अधिका-यांनी ती फेटाळली. मुशर्रफ यांच्या इस्लामाबाद मतदारसंघातील उमेदवारीला सईद तारिक अली या नागरिकाने आक्षेप घेतला होता. मुशर्रफ यांची स्वाक्षरी ओळखपत्रावरील स्वाक्षरीशी मिळतीजुळती नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी पंजाबमधील कासूर मतदारसंघातून अर्ज फेटाळण्यात आला होता. मुशर्रफ यांनी कराची, इस्लामाबाद, चित्राल आणि कासूर मतदारसंघातील निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला.

मुशर्रफांवर देशद्रोहाचा खटला?
दरम्यान, सरन्यायाधीश इफ्तिखार चौधरी यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठ मुशर्रफविरुद्ध देशद्रोहाचा खटला चालवण्याची मागणी करणा-या याचिकेवर सोमवारी सुनावणी करणार आहे. रावळपिंडी बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष तौकिफ असिफ यांनी ही याचिका दाखल केली आहे. बेनझीर हत्या प्रकरण, बलुच नेते अकबर बुक्तीविरुद्धच्या कारवाईसह मुशर्रफ यांच्यावर चार खटले दाखल आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी पीएमएल-एन पक्षाने केली आहे.