वॉशिंग्टन - वॉशिंग्टन आणि न्यूयॉर्कमध्ये रविवारी हजारो नागरिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांच्या छळामुळे अनेक कृष्णवर्णीयांचा मृत्यू झाल्याचा निषेध करण्यासाठी नागरिकांनी निदर्शने केली. संतप्त नागरिकांच्या हातात निषेधाचे फलक पाहायला मिळाले.
‘जस्टिस फॉर ऑल मार्च’मध्ये पोलिसांच्या अन्यायाचा बळी ठरलेल्या तरुणांचे कुटुंबीयदेखील सहभागी झाले होते. राजधानी आणि न्यूयॉर्कमध्येही हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभागी झाले होते. फर्ग्युसन, स्टीव्हन आयलंडमधील दोन जणांना पोलिसांनी दिलेली वागणूक चुकीची होती. पोलिसांच्या चुकीच्या तपास पद्धतीमुळेच दोघांनाही प्राण गमावावे लागले होते. या घटनांमुळे नागरिकांमध्ये पोलिसांच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. पोलिसांवरील विश्वास उडत चालला आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया निदर्शकांनी व्यक्त केली आहे. ‘ना जस्टिस नो पीस’, ‘स्टॉप रेसिस्ट पोलिस’, ‘आय काण्ट ब्रिथ’, अशा घोषणा देण्यात आल्या. कडाक्याच्या थंडीतही निदर्शकांचा उत्साह कायम असल्याचे पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. आम्ही न्यूयॉर्क शहर बंद पाडू, असा इशाराही आंदोलकांनी दिला. बोस्टनमध्येही पोलिसांच्या दडपशाहीच्या विरोधात आंदोलन झाले. कॅलिफोर्नियातील बर्किली, मॅसाचुसेट्समध्येही अनेक नागरिकांनी एकत्र येऊन पोलिसांच्या वर्णभेदी कृतीचा निषेध केला.
नोव्हेंबरमध्ये १२ वर्षीय लक्ष्य
क्लिव्हलँडमधील १२ वर्षाचा टॅमीर राइस हा पोलिसांच्या दादागिरीचा बळी ठरला. त्याशिवाय २०१२ मध्ये फ्लोरिडात शेजारच्या वॉचमनने केलेल्या गोळीबारात ट्रायव्हॉन मार्टिन नावाच्या मुलासही प्राण गमवावे लागले होते. गेल्या काही वर्षांत प्रगत राष्ट्र म्हणून अमेरिकेसमोर गुन्हेगारीची समस्याही आहे.
अविश्वासाचे वातावरण
गेल्या दोन वर्षांत पोलिसांकडून मिळणा-या वर्तनामुळे सामान्य कृष्णवर्णीय अमेरिकी नागरिकांवर
आपली लाडकी मुले गमवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आफ्रिकन-अमेरिकी समुदायातील नागरिकांमध्ये पोलिसांविषयी अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे.
ऑगस्टमध्ये पहिली घटना : मिसौरीमधील फर्ग्युसन येथे ऑगस्टमध्ये पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १८ वर्षांचा मायकल ब्राउन या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. त्याला पोलिसांचा बेजबाबदारपणा कारणीभूत असल्याचा ठपका आहे.
तर हा मोर्चा यशस्वी
वर्णभेदाच्या विरोधात हजारो लोक एकत्र आल्याचे पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीला जरी आपण सुरक्षित आहोत, अशी भावना निर्माण झाली तरी हे आंदोलन यशस्वी झाले आहे, असे
आम्ही मानतो.
- रोसालिंड वॅट्सन, विद्यार्थिनी.