मॉन्ट्रियल - हेलिकॉप्टरच्या साह्याने तुरुंगफोडी करून क्युबेकच्या मध्यवर्ती कारागृहातून तीन कैदी पळाल्याची धक्कादायक घटना कॅनडामधअये समोर आली आहे. गेल्या दोन वर्षातील क्युबेकमधील अशा प्रकारची ही दुसरी तुरुंगफोडी आहे.
रविवारी दुपारी सगळीकडे सामसुम असताना एक हेलिकॉप्टर मध्यवर्ती तुरूंगावर आले. त्याने दोर सोडला आणि त्या दोरावर चढून कैदी सहिसलामत पळाले. कैद्यांना घेऊन पळून गेलेले हेलिकॉप्टर आता नेमके कोठे उतरते याचा शोध घेण्यासाठी सभोवतालच्या परिसरात शोध मोहीम हाती घेण्यात आली असून लष्कर आणि विमानतळ अधिकार्यांचीही मदत घेतली जात आहे, असे कॅनडाच्या प्रांतिक पोलिसांनी सांगितले. या तिन्ही कैद्यांवरील खटल्याची सुनावणी सुरू होणार होती. तत्पूर्वीच ते पळून जाण्यात यशस्वी ठरले. यापूर्वी गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात एका हेलिकॉप्टरच्या वैमानिकाला बंदुकीचा धाक दाखवून सेंट जेरोम तुरुंगातून कैदी पळवून आणण्यास भाग पाडण्यात आले होते. तुरुंगावर हेलिकॉप्टर स्थिर ठेवून दोरखंडाच्या साह्याने कैदी उचलण्यात आले आणि त्यांना पळवून नेण्यात आले होते. पोलिसांनी काही तासांतच दोन कैदी आणि हेलिकॉप्टरच्या अपहरणकर्त्यांना अटक केली होती.