आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • To Explosed American Embassies, Attack As Like 9 11; Al Kaida Ordered

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेचे दूतावास उडवा, 9/11 पेक्षा भयंकर हल्ले क‍रा; अल कायद्याचा आदेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - अमेरिकेचा आखातातील हस्तक्षेप दूर करण्यासाठी त्यांचे दूतावास उडवून लावा. त्यासाठी 9/11 पेक्षाही भयंकर हल्ले करा, असा आदेश अल कायदाच्या म्होरक्याने दिला आहे. एका ऑनलाइन संदेशातून अल कायदाचे मनसुबे स्पष्ट झाल्याने अमेरिका हादरली आहे.


अल कायदाचा आखाती प्रदेशातील दहशतवादी कारवायांचा प्रमुख नसीर अल-वुहायशी व अयमान अल जवाहिरी यांच्यात गेल्या आठवड्यात संभाषण झाले. त्या संभाषणातून ही माहिती पुढे आली आहे. 11 सप्टेंबर 2001 च्या हल्ल्यापेक्षा भयंकर स्वरूपाचे हल्ले करण्याचे त्या संदेशात म्हटल्याचा दावा ‘न्यूयॉर्क टाइम्स’कडून करण्यात आला आहे. सुरुवातीला येमेनमधील अमेरिकेचे दूतावास उडवून लावण्यात यावे. हल्ला रविवारच्या आत करण्याची सूचनाही जवाहिरीने त्या संदेशात केली आहे. येमेनसह प्रदेशात अमेरिका आणि पाश्चात्त्य देशांच्या हिताला बाधा पोहोचली पाहिजे. ते संपुष्टात आले पाहिजेत. अल कायदाच्या धमकीनंतर अमेरिकेने भीतीपोटी आखाती तसेच मुस्लिम राष्ट्रांतील आपली राजदूत कार्यालये बंद करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही, तर 19 दूतावास 10 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचाही निर्णय अमेरिकेने घेतला आहे. 62 वर्षीय जवाहिरी ओसामा बिन लादेनच्या खात्म्यानंतर अल कायदाचा म्होरक्या बनला. अबोटाबादमध्ये अमेरिकेने केलेल्या कारवाईत लादेन ठार झाला. दोन्ही दहशतवाद्यांतील हा संदेश ऑडिओ स्वरूपाचा असून तो ऑनलाइन पोस्ट केला होता. तो संदेश गेल्या आठवड्यात अमेरिकेच्या हाती लागला. त्यामुळे अमेरिकेला दहशतवादी कारवायांची माहिती मिळाली आहे.


येमेनच का ?
लादेनच्या खात्म्यानंतर अल कायदाच्या दहशतवादी कारवायांवर काही प्रमाणात बंधने आली आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे संघटनेची दहशत राहिली नसल्याची जाणीव जवाहिरीला झाली आहे. त्यामुळेच जगभरात पुन्हा एकदा दहशत निर्माण करण्यासाठी येमेनमधील संघटनेचा वापर करण्याची योजना आहे. कारण अल कायदाची येमेनमधील संघटना सर्वात मजबूत मानली जाते. त्यामुळेच जवाहिरीने अमेरिकेच्या येमेनच्या दूतावासावर हल्ला करण्याचे आदेश दिले आहेत.


वुहायशी ‘जनरल मॅनेजर’
वुहायशी हा येमेनमध्ये राहून अल कायदाची सूत्रे पाहत असला तरी जगातील दहशतवादी नेटवर्कचा तो ‘जनरल मॅनेजर’ असल्याचे वर्णन अमेरिकेच्या अधिकाºयांनी केले आहे. त्याने स्वत:चे अल कायदामधील दुसºया क्रमांकाचा महत्त्वाचा व्यक्ती असे स्थान तयार केले आहे. लादेनच्या खात्म्यानंतर अल कायदाची सूत्रे जवाहिरीकडे आली आहेत.


विशेष दल सज्ज
अल कायदाचे मनसुबे उघड करणारा ऑनलाइन संदेश हाती लागल्यानंतर अमेरिकेने दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी आपल्या विशेष दलास सज्ज राहण्याचा इशारा दिला. संघटनेच्या आखातातील ठिकाणांना लक्ष्य करण्याची तयारी केली जात आहे. अमेरिकेचे संरक्षणमंत्री चक हॅगेल यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या विशेष दलास ही सूचना केली आहे. हल्ला करण्यास तयार राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पेंटागॉनने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर मंगळवारी येमेनमधील दूतावास कार्यालय पूर्णपणे रिकामे करण्यात आले आहे. त्यामुळे आता अनिश्चित काळासाठी येथील व्यवहार अमेरिकेला थांबवावे लागले आहेत.


देश सोडण्याचे आवाहन
येमेनमधील दूतावासाला टाळे लावल्यानंतर मंगळवारी अमेरिकेने आपल्या नागरिकांना तत्काळ देश सोडण्याचे आवाहन केले आहे. अमेरिकन नागरिकांनी शक्य तेवढ्या लवकर देश येमेन सोडून बाहेर पडावे. त्यांना सुरक्षेसाठी सर्व प्रकारची मदत देण्यास सरकार तयार आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे. सरकारने 16 जुलैला आपल्या नागरिकांना येमेनला न जाण्याचा सल्ला दिला होता.