आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Today Election In Pakistan Under The Bullet Fearing

पाकिस्तानात आज बंदुकीच्या धाकात मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद - रक्तरंजित प्रचाराच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात उद्या शनिवारी संसद आणि चार प्रांतिक मंडळांकरिता मतदान होत आहे. गेल्या 62 वर्षांमध्ये प्रथमच लोकनियुक्त सरकारकडून सत्तांतर होत आहे. नव्या संसदेतही कुण्या एका पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नाही, परंतु माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा पक्ष सर्वाधिक जागा जिंकेल, असा मतदानपूर्व चाचणीतील अंदाज आहे. मात्र, लष्कराचे पाठबळ असलेला क्रिकेटपटू इम्रान खानचा पक्षही या निवडणुकीत चमत्कार दाखवू शकतो.


संसदेचे कनिष्ठ सभागृह नॅशनल असेंब्लीच्या एकूण 342 जागांपैकी 272 जागांसाठी उद्या साडेआठ कोटी मतदार मतदान करणार आहेत.यापैकी 3 कोटी 60 लाख महिला मतदार आहेत.प्रचाराच्या सव्वा महिन्यात उमेदवार, कार्यकर्त्यांसह 100 वर बळी गेले आहेत. तेहरिक-ए-तालिबान व कट्टरपंथीयांच्या संघटनांचा वाढता उपद्रव असूनही उद्या गतवेळेसपेक्षा (44 टक्के) अधिक मतदान होईल, असे सांगितले जात आहे.


प्रमुख पक्ष : शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग (पीएमएल-एन), इम्रानचा तेहरिक-ए-इन्साफ यांच्याव्यतिरिक्त झरदारींचा पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी), सरहद्द गांधी - खान अब्दुल गफार खान संस्थापक असलेला अवामी नॅशनल पार्टी (एएनपी) मुत्ताहिदा कौमी मुव्हमेंट (एमक्यूएम ) हे प्रमुख व जमियत उलेमा ए इस्लाम, बलुचिस्तान नॅशनल पार्टी-मेंगल छोटे पक्ष रिंगणात आहेत.


अशी आहे पद्धत
एकू ण 342 जागांपैकी 272 जागा थेट लोकांमधून निवडल्या जातात. 60 महिलांसाठी, तर दहा जागा अल्पसंख्याकांसाठी (हिंदू-ख्रिश्चन) राखीव आहेत. प्रत्येक पक्षाला मिळालेल्या जागांच्या प्रमाणात 70 राखीव जागा वाटप केल्या जातात. त्यावर संसद सदस्य नियुक्त केले जातात.


172 जागा बहुमतासाठी आवश्यक आहेत. हा जादुई आकडा गाठणे एकाही पक्षाला शक्य होणार नाही, असे विविध सर्वेक्षणांचे अंदाज आहेत. शरीफ यांच्या पक्षाला सुमारे 125 च्या आसपास जागा मिळण्याची शक्यत आहे. इम्रानच्या पक्षाला लष्कराचे समर्थन असल्याचे सांगितले जाते. तरुण मतदार त्याच्या पाठीशी उभा राहील असे चित्र आहे. कदाचित तो किंगमेकरची भूमिकाही अदा करू शकतो.


महत्त्वाचे मुद्दे
ग्रामीण भागातील 20-20 तासांचे लोडशेडिंग, ढासळती अर्थव्यवस्था, अकार्यक्षम कारभार, प्रचंड भ्रष्टाचार, गुंडागिरी, दहशतवाद,
हिंसाचार, अपघात, अपहरण
प्रचाराच्या काळातील हिंसाचारात 100 वर बळी, गिलानींच्या मुलाचे अपहरण आणि इम्रान खानचा अपघात अशा घटना घडल्या.


पाकिस्तानी भाविकांना पाठवू नका : भारत
सुरक्षेच्या कारणास्तव अजमेरमधील सुफी दर्ग्याच्या वार्षिक उरुसात पाकिस्तानी ‘जायरिन’(भाविक ) पाठवू नका, अशी शिफारस भारताने पाकिस्तानकडे केली आहे. सरबजितच्या मृत्यूनंतर भारतीय नागरिक संतप्त झाले असून त्यामुळे जायरिनच्या सुरक्षेची हमी देता येत नाही असे भारताने म्हटले आहे. अजमेरचे संत ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांचा वार्षिक उरूस 13 ते 23 मेदरम्यान होणार आहे.या उरुसासाठी सहाशेच्यावर जायरिन अजमेरला येणार आहेत.


सनाउल्लाहचा पाकिस्तानात दफनविधी
सनाउल्लाहचाही त्याच्या गावी उरा येथे पाकिस्तानने शासकीय इतमामात दफनविधी केला. जम्मू येथील कोट भलवाल तुरुंगात हल्ला झाल्यानंतर गुरुवारी सनाउल्लाहचा मृत्यू झाला होता.सरबजितसिंगवरही भारतानेही शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले होते.त्याचीच पुनरावृत्ती पाकने केली.