आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Twin Blasts At Bus Station In Nigeria’s Capital, Kill 71, Injure 124

नायजेरिया शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरले; 71 ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अबुजा - नायजेरियन राजधानीजवळ सोमवारी झालेल्या भीषण स्फोटांत 71 जण ठार, तर 124 जखमी झाले. ही घटना बसस्थानकावर घडल्याने घटनास्थळी रक्ताचा सडाच पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

सोमवारी सकाळी हा स्फोट झाला. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या घटनेनंतर बसस्थानकावर एकच गोंधळ उडाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे अबुजा पोलिसांकडून सांगण्यात आले. स्फोट एवढा भयंकर होता की नयान्या मोटर पार्क भागात 4 फूट खोल खड्डा पडला आहे. शहरापासून 16 किलोमीटर अंतरावर दोन स्फोट झाले. त्यात 30 वाहनांचे नुकसान झाले. स्फोटामुळे इंधनाच्या टाक्यांनी पेट घेतल्यानंतर वाहनांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. स्फोटामागील नेमके कारण मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. सरकारकडूनही त्यावर अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले नाही. दरम्यान, मृतांचा निश्चित आकडा अद्याप स्पष्ट झालेला नाही. तो वाढूही शकतो, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. बसखाली मोठ्या प्रमाणात स्फोटके दडवण्यात आली होती. परिसरातील असंख्य वाहनांचे नुकसान झाले आहे.

बोको हरम सक्रिय
राजधानीवर 2011 मध्ये बोको हरम दहशतवादी संघटनेकडून जोरदार हल्ला करण्यात आला होता. अबुजामधील संयुक्त राष्ट्राच्या इमारतीसमोर दोन आत्मघाती स्फोट घडवण्यात आले होते. त्यात किमान 21 जण ठार तर 60 जखमी झाले होते. त्यामुळे सोमवारच्या हल्ल्यामागे बोको हरम गटाचा हात असू शकतो.

स्फोटानंतर निघाला धूर
मला बसस्थानकावर जायचे होते. परंतु अचानक कानठळ्या बसतील असा स्फोटाचा आवाज झाला आणि नंतर स्थानकातून धूर निघू लागला. लोक जीव मुठीत घेऊन सैरावैरा पळू लागले. उभ्या आयुष्यात मी अशा प्रकारची घटना कधी पाहिली नव्हती. प्रचंड दहशतीचे वातावरण या भागात आहे, असे एक प्रत्यक्षदर्शी मिमी डॅनिएल्स यांनी सांगितले.

इस्लामी कट्टरवाद्यांवर सरकारचा संशय
राजधानी अबुजामध्ये घातपाती कारवाया घडवून लक्ष्य करण्याचा इशारा काही दिवसांपूर्वी इस्लामी कट्टरवाद्यांकडून देण्यात आला होता. त्यामुळे हा स्फोट त्यांनीच घडवला असावा असा संशय आहे. याच वर्षी कट्टरवादी संघटनेने केलेल्या हिंसाचारात 1500 लोक ठार झाले होते.

नायजेरियन नागरिकास भारतात शिक्षा
भारतात बेकायदा राहतानाच अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणात एका 33 वर्षीय नायजेरियन व्यक्तीला विशेष न्यायालयाने चार वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. एडॉम सिमन छिमेझी हा दोषी आढळून आल्यानंतर न्यायाधीश शैल जैन यांनी हा निकाल दिला. भारतात बेकायदा राहत असल्याच्या खटल्यातही तो दोषी आढळून आला आहे.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, छायाचित्रे...