आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ट्विटर’वर सायबर हल्ला, अडीच लाख पासवर्ड चोरले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रान्सिस्को - जगभरात लोकप्रिय असलेली मायक्रोब्लॉगिंग नेटवर्किंग साइट ‘ट्विटर’वर सायबर हल्ला करण्यात आला आहे. हॅकर्सनी सुमारे 2 लाख 50 हजार पासवर्डस चोरले असून या हल्याने सायबर विश्वात खळबळ उडाली आहे. सायबर हल्ला सराईत हॅकर्सकडून झालेला नाही.मात्र अत्यंत सफाईपणे एकाचवेळी करण्यात आला असे कंपनीचे म्हणणे आहे.

दोनच दिवसांपूर्वी अमेरिकी प्रसारमाध्यम जगतातील आघाडीची वृत्तपत्रे न्यूयॉर्क टाइम्स आणि वॉल स्ट्रीट जर्नल यांच्या वेबसाइटवर चीन हॅकर्सनी हल्ले केले होते.त्यापाठोपाठ ट्विटरवर हल्ला झाला आहे. सायबर हल्ला सराईत हल्लेखोरांकडून झाल्याचे आम्हाला वाटत नाही. त्याचबरोबर तो वेगवेगळ्या टप्प्यातही करण्यात आलेला नाही, असे ट्विटरच्या माहिती सुरक्षा विभागाचे संचालक बॉब लॉर्ड यांनी पोस्ट करून ही माहिती दिली. अमेरिकी तंत्रज्ञान आणि मीडिया कंपनीला लक्ष्य करून हा हल्ला झाला आहे. हल्ला अतिशय सफाईदारपणे करण्यात आला आहे. हल्ले रोखण्याचे कामही ट्विटरने सुरू केले आहे. परंतु हॅकर्सनी युजरनेम, ई-मेलचे पत्ते, पासवर्ड्स व इतर तपशील मिळवले असावेत, अशी शक्यता आहे.

‘जावा’ मुळे घात? - जगभरात बहुतांश ‘जावा ’संगणकीय भाषेचा वापर केला जातो. ही भाषा लवचिक असल्याने एखाद्या कर्मचा-याच्या घरच्या अथवा कार्यालयाच्या संगणकावर हल्ला करून नेटवर्कमध्ये घुसखोरी झाली असावी असे तज्ज्ञांचे मत आहे.

140 शब्द मर्यादा असलेल्या ट्विटरचा संदेश देण्यासाठी जास्त वापर केला जातो. मात्र यातील युजर्सची माहिती चोरून आक्षेपार्ह संदेश अथवा युजर्सचा पत्ता शोधला जाण्याचा धोका असल्याचे मत सायबर सुरक्षा तज्ज्ञ अश्कान सोल्तानी यांनी सांगितले.

मीडियावर हल्ला - अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स, द वॉल स्ट्रीट जर्नल वृत्तपत्रांवर याच आठवड्यात सायबर हल्ला झाला होता. त्यांच्या वेबसाइट हॅक करण्यात आल्या. हा हल्ला चिनी हॅकर्सकडून झाल्याचे सांगण्यात आले.

युजर्सना अलर्ट - ट्विटरने खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या युजर्सना नवीन पासवर्ड तयार करण्याची सूचना जारी केली आहे. सोशल नेटवर्किंगमध्ये ट्विटर आघाडीवर आहे.

इराकी पंतप्रधानांचीही वेबसाइट हॅक - गेल्या आठवड्यापासून सातत्याने विरोधाचा सामना करणारे इराकी पंतप्रधान नुरी अल-मलिकी यांची वेबसाइट शनिवारी हॅक करण्यात आली. मलिकी यांनी पदावरून पायउतार व्हावे. मलिकींचा कारभार हुकूमशहासारखा असून त्यांनी सत्ता सोडली नाही तर त्यांचा शेवट सिरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांच्याप्रमाणे करण्यात येईल, असा इशारा हॅकर्सनी दिला आहे. टीम कुवेत हॅकर्स अशी हल्लेखोरांनी आपली ओळख सांगितली आहे.

चीन सरकारवर संशय - अमेरिकी मीडियावरील हल्ल्याशी या सायबर हल्ल्याचा संबंध आहे का, याविषयीची माहिती अद्याप उपलब्ध होऊ शकलेली नाही. अमेरिकेतील हायप्रोफाइल मीडिया संस्था सायबर हल्ल्याचे शिकार झाल्या आहेत. चिनी सरकारने गुप्तपणे हा सायबर हल्ला घडवून आणल्याचा आरोप करण्यात येत आहे.

20 कोटी युजर्सची संख्या जगभरात आहे. डिसेंबरमध्ये ही माहिती जाहीर करण्यात आली होती.