आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डॉक्टरांच्या हत्येप्रकरणी दोन अतिरेक्यांना पाकमध्ये फाशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - शिया डॉक्टरच्या हत्या प्रकरणात दोषी लष्कर-ए-झांगवीच्या दोन अतिरेक्यांना मंगळवारी फाशी देण्यात आली. फाशीवरील बंदी उठवल्यानंतरची ही २२ वी शिक्षा आहे. अताउल्लाह आणि मुहंमद आझम या लष्कर-ए-झांगवीशी संबंधित अतिरेक्यांना कराचीच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा देण्यात आली.

अताउल्लाह आणि मुहंमद आझम यांनी २००१ मध्ये शिया पंथीय डॉक्टर अली राझा यांची हत्या केली होती. दहशतवादविरोधी न्यायालयाने २००४ मध्ये त्यांना दोषी धरले होते. सर्वोच्च न्यायालयाने त्यांची शिक्षा कायम ठेवल्यानंतर दोघांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. तालिबानने पेशावर शाळेवर केलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवली होती. लष्कर-ए-झांगवी हा सुन्नी मूलतत्त्ववादी गट वारंवार शिया पंथीयांवर हल्ले करत आहे. आत्मघाती हल्लेखोराने शिकारपूर जिल्ह्यात शुक्रवारी घडवून आणलेल्या स्फोटात ६१ जण ठार झाले होते.

शाळेत हातबॉम्ब फेकले, जीवितहानी नाही
कराचीतील गुलशन-ए-इक्बाल परिसरातील एका शाळेवर मोटारसायकलवरून आलेल्या सहा अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकले. हल्ल्या वेळी शाळेत कर्मचारी अथवा विद्यार्थी नव्हते त्यामुळे जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी शोध मोहीम हाती घेतली, मात्र कोणालाही अटक करण्यात आली नाही.

सहा अतिरेक्यांना पाकमध्ये अटक
इस्लामाबादमध्ये विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत तालिबानशी संबंधित सहा अतिरेक्यांना अटक करण्यात आली. तुर्नोल, बारा काहू आणि शाहजाद शहरात अतिरेकी दडून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम घेण्यात आली.

वायव्य प्रांतातील स्फोटात चार ठार
पाकिस्तानच्या वायव्य प्रांतात रस्त्याच्या कडेला ठेवण्यात आलेल्या उपकरणाचा स्फोट हाेऊन किमान चार जवान ठार झाले. अफगाणिस्तानलगतच्या मध्य कुर्रम एजन्सी सीमेवर रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हा स्फोट घडवून आणला.