आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ukraine Forces And Pro Russian Militants Battle Over Local Police Station

युक्रेनमध्ये रशिया समर्थक बंडखोरांविरुद्ध कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोनेस्टक - क्रिमिया प्रकरणानंतर अशांत बनलेल्या पूर्वेकडील भागात युक्रेन सरकारने रविवारी दहशतवाद प्रतिबंधक मोहिमेला सुरुवात केली. शनिवारपासून येथील एका पोलिस ठाण्यावर ताबा मिळवणार्‍या रशियन समर्थक सशस्त्र बंडखोरांना हुसकावण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली आहे.

स्लेव्हयान्स्क शहरातील पोलिस ठाणे बंडखोरांनी बळजबरीने ताब्यात घेतले आहे. बंडखोरांचा मुकाबला करण्यासाठी सरकारने रविवारी ही लष्करी मोहीम जाहीर केली आहे. बंडखोरांनी लष्करावर जोरदार गोळीबार केला. त्याला उत्तर देण्यासाठी देशाचे लष्कर या विशेष मोहिमेत सहभागी झाल्याची माहिती युक्रेनचे गृहमंत्री अर्सेन अवाकोव्ह यांनी फेसबुकवरून दिली. पूर्वेकडील सुरक्षा दलाच्या इमारतींवर शनिवारी बंडखोरांनी जोरदार हल्ले केले होते. लष्करी वेशात येऊन हे हल्ले करण्यात आले होते. काही इमारतीदेखील ताब्यात घेण्यात आल्या होत्या. रशियन समर्थक नागरिकांनी प्रदेशातील स्वायत्तता देण्याची मागणी केल्याच्या आठ दिवसांनंतर हा हल्ला करण्यात आला. रशियाकडून दाखवण्यात आलेल्या आक्रमक धोरणाचाच हा एक भाग आहे, असे अवाकोव्ह यांनी म्हटले आहे. हल्ल्यानंतर पूर्वेकडे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बंडखोरांच्या विरोधात बळाचा वापर करण्यात येऊ नये, असा इशारा रशियाने युक्रेनला दिला आहे. युक्रेनने आतापर्यंत केलेल्या कारवाईत एका बंडखोराचा मृत्यू झाल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. या प्रश्नी आंतरराष्ट्रीय समुदायाकडून चिंता व्यक्त केली आहे.

तणावातच बिडेन दौर्‍यावर
युक्रेनमध्ये उद्भवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जो बिडेन 22 एप्रिल रोजी युक्रेन दौर्‍यावर जाणार आहेत, अशी माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे.

जॉन केरी यांचा फोन
युक्रेनमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी शनिवारी रशियाकडे तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली. केरी यांनी त्यांचे रशियन समपदस्थ सेर्जिइ लाव्हरोव्ह यांना फोनवरून बोलताना केरी यांनी युक्रेनमधील हस्तक्षेप थांबवावा. त्यासाठी सीमेवरील सैन्य मागे घेण्यात यावे. अन्यथा त्यामुळे संघर्षाची स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा दिला आहे.

राजकीय उलथापालथ
युक्रेनमध्ये रशियन समर्थक राष्ट्राध्यक्ष व्हिक्टर यांकोविच यांच्या विरोधात आंदोलन करून त्यांना पदावरून हटवले. त्यानंतर देशात उलथापालथ सुरू झाली. जनमत पाहणीद्वारे क्रिमियाला स्वायत्त स्वरूप देऊन त्याला रशियात विलीन करण्यात आले आहे. देशाच्या इतर भागांत होणार्‍या आंदोलनामागेदेखील रशियाचा हात असावा, असे पाश्चात्त्य देशांना वाटते. युक्रेनच्या सीमेवर 40 हजार रशियन सैन्य तैनात करण्यात आले आहेत.

रशियाविरुद्ध पाश्चात्त्य राष्ट्रे
क्रिमियामध्ये झालेल्या जनमताच्या आधारावर रशियाने क्रिमियाचे विलिनीकरण करून घेतल्यानंतर पाश्चात्त्य देश रशियाविरुद्ध दंड थोपटून उभे टाकले आहेत. त्यामुळे रशियावर मार्च महिन्यात पहिल्यांदा निर्बंध लादण्यात आले.