स्लोवियास्क - युक्रेनच्या लष्कराने स्लोवियास्कवर पुन्हा ताबा मिळवण्यासाठी बंडखोरांच्या विरोधात मोठ्याप्रमाणात कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईत एक वैमानिक ठार झाल्याचे वृत्त आहे. रशिया समर्थक बंडखोरांनी क्षेपणास्त्राद्वारे ल्ष्कराच्या एका हेलिकॉप्टरवर हल्ला केला. त्यात एक पायलट ठार झाला तर एक जखमी असल्याचे युक्रेनचे गृहमंत्री अरसेन अवाकोव्ह यांनी सांगितले.
एक वैमानिक ताब्यात
आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, स्लोवियास्कमधील तीन चेक पॉईंट अजूनही बंडखोरांच्या ताब्यात आहेत. मोहिमेदरम्यान बंदूकधारी बंडखोरांच्या हल्ल्यात युक्रेनच्या लष्कराच्या दोन हेलिकॉप्टरचे नुकसान झाले. तसेच एक वैमानिकही बंडखोरांच्या ताब्यात आहे. स्लोवियास्क बंडखोरांच्या ताब्यात असून ते आणखी पाय पसरण्याच्या तयारीत आहेत.
अवाकोव्हचा आरोप
बंडखोर युक्रेनच्या लष्कराच्या विरोधात तोफा, ग्रेनाईड लाँचरसह क्षेपणास्त्रांचा वापर करत असल्याचे गृहमंत्री अवाकोव्ह यांनी फेसबूकवर पोस्ट केले आहे. विभाजनवादी बंडखोर सराईत अशा भाड्याच्या जवानांचा हल्ल्यासाठी वापर करत असल्याचा आरोपही अवाकोव्ह यांनी केला आहे.
मोहिमेचा उद्देश
हेलिकॉप्टरवर करण्यात आलेला हल्ला हा, युक्रेनच्या लष्कराकडून सुरू असलेल्या कारवाईला उत्तर असल्याचे बंडखोरांनी म्हटले आहे. गृहमंत्री अवाकोव्ह यांनी मात्र आपली दहशतवाहिवरोधी मोहीम ही अत्यंत मोजक्या प्रमाणात असल्याचे म्हटले आहे. बंधकांना मुक्त करणे आणि बंडखोरांना शस्त्रसंधी करण्यास भाग पाडणे एवढाच अभियानाचा उद्देश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारी इमारती रिकाम्या व्हाव्यात आणि पुन्हा सर्वकाही सुरळीत व्हावे हाच उद्देश असल्याचेही ते म्हणाले. स्लोवियास्क येथे शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता युद्ध सुरू झाल्याचे स्थानिक अधिका-यांनी सांगितले.
रशियन सैन्याच्या पाठिंब्याची शक्यता
य घटनेमध्ये विमान व क्षेपणास्त्रांचा वापर झाल्यामुळे स्लोवियास्क शहरामध्ये रशियाच्या सैन्याची उपस्थिती असल्याची शक्यता युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. शहराबाहेर लष्कराच्या गाड्यांमध्ये रशियाचे सैनिक दिसून आल्याचे अधिकारी म्हणाले.
पुढील स्लाईडवर बघा, युद्धाची छायाचित्रे....