आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्कापातापासून वाचण्यासाठी 'प्रार्थना' हाच उपाय!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयॉर्क- तुमच्या शहराच्या दिशेने येणार्‍या महाकाय उल्केपासून बचाव करायचा असेल तर आम्ही काय करायला हवे? 'त्या उल्केची पृथ्वीशी टक्कर होऊ नये म्हणून प्रार्थना करायला हवी', हे मत आहे अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेचे प्रमुख चार्लस बोल्डन यांचे.

बोल्डन यांनी अमेरिकी काँग्रेसच्या विज्ञान समितीच्या बैठकीत हे उत्तर दिले. पृथ्वीच्या दिशेने वेगाने येत असलेल्या उल्कांपासून बचाव करण्यासाठी नासा काय उपाय योजना करत आहे? या योजनेवर किती खर्च येईल? असा प्रश्न त्यांना अमेरिकेच्या खासदारांनी विचारला होता. त्यावर बोल्डन म्हणाले की, 'सध्या उपलब्ध असलेल्या माहितीवरून उल्कापातापासून सध्या तरी अमेरिकेच्या जनतेला कोणताही धोका नाही. परंतु तीन आठवड्यात एखादी उल्का आमच्या दिशेने येत असेल तर बस्स केवळ प्रार्थना करा!'

मागील महिन्यात मोठय़ा विद्धंवसापासून आपण वाचलो. त्यामुळे आपण नशीबवानच आहोत. फेब्रुवारी महिन्यात 17 मीटर व्यासाच्या उल्केचा रशियातील चेलियाबिंस्क शहरावर स्फोट झाला होता. अनेक इमारतींची नासधूस झाली आणि 1500 लोक जखमी झाले. त्याच्या दुसर्‍याच दिवशी एक लघुग्रह पृथ्वीपासून सुमारे 27 हजार 681 किलो मीटर अंतरावरून निघून गेला, असे विज्ञान समितीचे अध्यक्ष लमर स्मिथ यांनी सांगितले.

फक्त 10 टक्के 'सिटी किलर्स'चीच माहिती- अंतराळात सुमारे 10 हजार 'सिटी किलर' उल्का असून त्यापैकी केवळ 10 टक्केच उल्कांची माहिती मिळवणे शक्य झाले आहे. त्यांचा व्यास 50 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त आहे. 6.6 कोटी वर्षांपूर्वी 10 किलो मीटर व्यासाच्या एका उल्काचे पृथ्वीशी टक्कर झाली होती. ती मेक्सिकोतील युकाटन बेटावर पडली होती. त्यामध्ये महाकाय डायनासोरचा विनाश झाला.