आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • United Nations Not Solve Kashmir Issue Bilawal Bhutto

काश्मीर प्रश्न सोडवण्यास संयुक्त राष्ट्र कुचकामी, बिलावलची मुक्ताफळे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानात सत्ता गमावल्यानंतर शरीफ सरकारविरुद्ध मोर्चेबांधणी करून जनतेवरील पकड मजबूत करू पाहणारे बेनझीर भुत्तो यांचे पुत्र व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे नेते बिलावल यांनी सध्या वादग्रस्त वक्तव्यांची जंत्रीच लावली आहे. भारताचा काश्मीर हिसकावून घेईन म्हणत दिवास्वप्न पाहणा-या या युवा नेत्याने आता संयुक्त राष्ट्रसंघ काश्मीर प्रश्न सोडवण्यात कुचकामी ठरल्याचे सांगून मुक्ताफळे उधळली.

भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण संबंधांचे कारण काश्मीर असून संयुक्त राष्ट्रसंघाची हा प्रश्न सोडवण्याबाबत असलेली भूमिका अपयशी ठरल्याचे बिलावल म्हणाले. विशेष म्हणजे नवाझ शरीफ सरकारने संयुक्त राष्ट्रसंघात घेतलेल्या भूमिकेच्या नेमकी विरोधी भूमिका बिलावल यांनी घेतली आहे.

शरीफ सरकारमध्ये राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र व्यवहार खात्याचे सल्लागार सरताज अजीज यांनी संयुक्त राष्ट्रसंघाला पत्र लिहून हा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली आहे. दुसरीकडे बिलावल मात्र ही जागतिक सर्वोच्च संघटना कुचकामी असल्याचे सांगून आपल्या अकलेचे तारे तोडले.

‘द नेशन’ मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तानुसार, बिलावल यांनी सिंध प्रांत असेंब्लीमध्ये नॅशनल यूथ पार्लमेंट सेशनसमोर बोलताना संयुक्त राष्ट्राला लक्ष्य केले. काश्मीर मुद्दा सोडवण्याच्या दृष्टीने हा प्रस्ताव लागू करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. काश्मीर हेच दोन्ही देशांदरम्यान असलेल्या तणावाचे मुख्य व एकमेव कारण असल्याचे बिलावल म्हणाले.
बेनझीर भुत्तोंच्या हत्येनंतर पीपल्स पार्टीचे नेतृत्व त्यांचे पती आसिफ अली झरदारी यांच्याकडे आले. मात्र बिलावल प्रत्यक्ष राजकारणात उतरले नाहीत. पाकिस्तान पीपल्स पार्टीने सत्ता काबीज केल्यानंतर पाच वर्षे झरदारी राष्ट्रपतिपदी विराजमान झाले. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शरीफ यांनी पीपल्स पार्टीचा पराभव करून सत्ता काबीज केली. त्यानंतर पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी आता बिलावल सरसावले आहेत.

जुनी पिढी अपयशी
बिलावल म्हणाले, संयुक्त राष्ट्राचा प्रस्ताव- ११७२ अंतर्गत पाकिस्तान आणि भारतावर अणुतंत्रज्ञान आणि यासाठीची सामग्री उपलब्ध करून देण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, दोन्ही देशांवर ही बंदी असताना भारताच्या संदर्भात हे नियम लागू करण्यात आलेले नाहीत. पाकिस्तानातील जुन्या पिढीला हा प्रश्न सोडवण्यात यश आले नाही. मात्र, नवीन पिढी निश्चितपणे हा प्रश्न सोडवून यश मिळवेल, असा दावा त्यांनी केला. काश्मीरप्रश्नी बिलावल यांच्या कार्यकर्त्यांनी सतत आंदोलने केली असून काश्मीर प्रश्नाकडे जगाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.