आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Unlimit Internet Use Lead Online Murder In Year End, Divya Marathi

इंटरनेटच्या अमर्याद वापरामुळे वर्षअखेर ‘ऑनलाइन हत्या’, अमेरिकन इंटरनेट सुरक्षा कंपनीचा दावा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - इंटरनेटच्या अमर्याद वापराचा कहर म्हणजे ‘ऑनलाइन मर्डर’ या वर्षअखेरपर्यंत होऊ शकतो, असा दावा एखाद्या ज्योतिषाने नव्हे तर एका अमेरिकन इंटरनेट सुरक्षा कंपनीनेच केला आहे. कंपनीतर्फे गेल्या आठवड्यात प्रकाशित एका अहवालानुसार, स्मार्ट घर, स्मार्ट ऑफिसद्वारे हा धोका आणखी वाढू शकतो.

‘द इंडिपेंडंट’ या ब्रिटिश वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, आयएलडी या अमेरिकन इंटरनेट सुरक्षा कंपनीने युरोपातील पोलिस विभागासाठी हा अहवाल तयार केला आहे. कंपनीच्या मते, सध्या इंटरनेटवरील उपकरणांशी छेडछाड करून हत्या झाल्याचे सिद्ध करण्यात आलेले नाही. मात्र या वर्षअखेरपर्यंत अशी घटना घडू शकते. या अहवालाच्या आधारे युरोपियन पोलिसांना इशारा देण्यात आला आहे की, स्मार्ट सिटी, स्मार्ट ऑफिसमध्ये लावण्यात आलेल्या उपकरणांच्या सुरक्षेत झालेली कोणतीही चूक धोकादायक ठरू शकते.

कल्पना वास्तवात उतरणार
अमेरिकन थ्रिलर सिरीज ‘होमलँड’ मध्ये एका व्यक्तीच्या हृदयात लावण्यात आलेले उपकरण हॅक करून त्याच व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. गेल्या वर्षी अमेरिकन उपराष्ट्रपती डिक चेनी यांनीही आपल्याला या धोक्याचा संशय होता, असा खुलासा केला होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या हृदयात लावलेले डिफायब्रलेटर बंद करवले होते. हे उपकरण हॅक करून हृदयविकाराचा झटका निर्माण केला जाऊ शकतो, असा संशय त्यांना होता.

ऑनलाइन खंडणीचेही आव्हान
सध्या खंडणी आणि ब्लॅकमेलिंगदेखील ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्याचे संकेत अमेरिकन सुरक्षा कंपनीच्या अहवालात देण्यात आले आहेत. इंटरनेट उपकरणाच्या मदतीने गुन्हेगार स्मार्ट कार किंवा घरात लोकांना बंधक बनवत असून खंडणीची रक्कम मिळेपर्यंत त्यांना सोडले जात नाही. अशाच एका घटनेत गुन्हेगारांनी वेबकॅम हॅक करून एका व्यक्तीचा खासगी फोटो काढून ब्लॅकमेलही केल्याचे समोर आले आहे.

आरोग्य क्षेत्रालाही धोका : अमेरिकन आरोग्य विभागाने विविध रुग्णालयांमध्ये वापरण्यात येणा-या उपकरणांची सुरक्षा आणखी वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. विभागाच्या मते, अमेरिकन रुग्णालयात सध्या छेडछाड केली जाऊ शकते, अशा ३०० उपकरणांचा वापर होत आहे. नुकत्याच झालेल्या एका घटनेत हॅकर्सनी गर्भावस्थेतील धोक्याची पातळी दर्शवणारे उपकरण हॅक करून त्याचा वेग कमी केला होता.