जिनेव्हा - आयएस या अतिरेकी संघटनेने ब्रिटिश नागरिक डेव्हडि हेन्स याचा शिरच्छेद केल्याच्या घटनेबाबत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे. हे कृत्य अत्यंत क्रूर असून ते अक्षम्य असल्याचे परिषदेने म्हटले आहे.
सुरक्षा परिषदेने म्हटले आहे की, हे पाशवी कृत्य करणा-या तसेच असहिष्णुता, हिंसा आणि घृणेचे बीज रोवणा-या इस्लामिक स्टेटचा पराभव अटळ आहे. या संघटनेचा मुळापासून नायनाट केला जाईल. सुरक्षा परिषदेच्या मते, आयएसच्या या कृत्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद घाबरली नाही तर यामुळे सर्व सदस्य राष्ट्रांमध्ये आयएस तसेच इतर जिहादी संघटनांविरोधात एकजूट होण्याची ताकद मिळते.
सुरक्षा परिषदेने अल कायदा आणि इतर दहशतवादी संघटनांना ओलीस ठेवलेल्या सर्व नागरिकांची विनाशर्त तत्काळ सुटका करण्याची मागणी केली आहे. हेंसच्या हत्येनंतर आयएसला संपवण्यासाठी अमेिरकेने आंतरराष्ट्रीय संघटना स्थापण्याची मोहीम वेगाने सुरू केली.