आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरंगत्या बेटावर राहतात उरोस आदिवासी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


पेरू येथील उरोस या दक्षिण अमेरिकन आदिवासी समूहातील लोकांनी स्वत:च निर्माण केलेली वसाहत खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे. येथील व्यवस्था जगातील कोणत्याही कोप-यात पाहावयास मिळणार नाही. उरोस समूहातील लोक मानवनिर्मित फ्लोटिंग आयलँडवर (तरंगणारी बेटे) राहत आहेत. पेरूमधील टिटिकाका सरोवर परिसरातील इतर आदिवासींपासून स्वत:चे संरक्षण करण्यासाठी उरोस आदिवासींनी ही मजबूत बेटे तयार केली आहेत. दक्षिण अमेरिकेतील या सर्वात मोठ्या सरोवरामुळे तेथील आदिवासींना पुरेसे संरक्षण मिळत आहे. याची दोन कारणे आहेत. पहिले- हे मुख्य वस्तीपासून अलिप्त आहे.

दुसरे- समुद्रसपाटीपासून 3000 मीटर उंचीवर आहे. मात्र, उरोस आदिवासी या सरोवरावरील संरक्षण यंत्रणेवर समाधानी नव्हते. सरोवरावर मोठ्या प्रमाणात उगवणा-या बोरू या वनस्पतीचा योग्य वापर करून आपली संरक्षण व्यवस्था बळकट करण्याचे ठरवले. लवचिक बोरूला वाळवून तिचे बंडल तयार केले आणि त्यापासून पाण्यावर तरंगणारे उत्कृष्ट बेट (फ्लोटिंग आयलँड) तयार केले . एखाद्या संकटकालीन परिस्थितीत मुख्य वस्ती सोडून इतर ठिकाणी पलायन करण्यासाठी हे तरंगणारे बेट खूप उपयुक्त ठरते. उरोस आदिवासी या बेटाला ‘टॉरटोरा आयलँड’ म्हणतात. समूहातील सुमारे 500 लोक (आदिवासी जातीतील अर्धी लोकसंख्या) अशाच पारंपरिक आणि सुरक्षित पद्धतीने राहणे पसंत करत आहेत.

या आदिवासी लोकांनी आपल्या फ्लोटिंग आयलँडवर काही आधुनिक सोयी-सुविधा करून त्याला नवे रूप दिले आहे. टिटिकाका सरोवरात अशा प्रकारचे 40 फ्लोटिंग आयलँड आहेत. या सर्व बेटांमध्ये एक सेंट्रल आयलँड आहे, जे आदिवासी समुदायाच्या केंद्रबिंदूप्रमाणे काम करते. उरोस आदिवासी टॉरटोरा रीड आयलँडला खूप काळजीपूर्वक तयार करतात. बोरूला आतील बाजूने अशा प्रकारे विणले जाते की, त्याची जाडी दोन मीटर एवढी होते. सर्व बोरू एकाच ठिकाणी बांधून ठेवणारा बेटाचा छोटा भाग सरोवरात बुडालेला असतो. एक बेट जवळपास 30 वर्षे सुरक्षित राहते. पाण्यात गेलेला बोरूचा भाग लवकर खराब होतो त्यामुळे एक बेट वर्षातून चार वेळा दुरुस्त केले जाते. उरोस आदिवासी बोरूपासून आयोडिन तयार करून विकतात. जखमेवर आयोडिन लावल्यामुळे वेदना कमी होतात. उरोस आदिवासींनी परिसरातील नैसर्गिक संपत्ती वापरून निसर्गासोबत जगण्याची कला आत्मसात केली आहे.
odditycentral.com