आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US And Russia Agree On Pact To Defuse Ukraine Crisis

युक्रेनप्रश्नी रशिया नरमले;फुटीरतावाद्यांच्या तळावर हवाई हल्ला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किव्ह - रशियन समर्थकांवरील युक्रेनच्या कारवाईमुळे संतापलेल्या रशियाने गृहयुद्धाची धमकी दिल्याच्या दुसर्‍याच दिवशी नरमाईची भूमिका घेतली. हा प्रश्न चर्चेच्या माध्यमातून सुटेल, असा पवित्रा राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी घेतला. दुसरीकडे अमेरिकेने दिलेल्या इशार्‍यामुळेच रशियाला आपल्या आक्रमकतेला आवर घालावा लागल्याचे सांगितले जाते.

युक्रेनच्या पूर्वेकडील सीमेवर रशियन फौजा तैनात करण्यात आल्या आहेत. त्या अगोदर प्रांतातील दहाहून अधिक शहरांवर रशियन समर्थकांनी ताबा मिळवल्यानंतर युक्रेनने लष्करी कारवाई केली. त्यामुळे रशियाकडून संताप व्यक्त करण्यात आला होता. त्याचबरोबर युक्रेन गृहयुद्धाच्या उंबरठ्यावर असल्याचा इशारा देण्यात आला होता. रशियन समर्थकांवर बळाचा वापर करू नये, असे सांगून रशियाने लष्करी कारवाईचे संकेत दिल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने युक्रेनच्या भूमिकेला जोरदार पाठिंबा दिला. त्यानंतर रशियाने गुरुवारी आपल्या आक्रमकतेला आवर घालताना चर्चेतून मार्ग काढण्याची तयारी दर्शवली. टीव्हीवरील एका कार्यक्रमातून व्लादिमीर पुतीन यांनी फोनवरून चर्चेची मागणी केली. या समस्येवर केवळ चर्चा हाच तोडगा असू शकतो. ही लोकशाही पद्धत आहे. त्यांची ही नवी भूमिका सरकारी वाहिनीवरून प्रसारित करण्यात आली.

अमेरिकी लष्कराची भीती-ओबामा
रशियाकडून युक्रेनच्या सार्वभौमत्वाचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. परंतु त्यांना युक्रेनच्या फौजांवर लष्करी कारवाई करता येऊ शकणार नाही. कारण आमचा युक्रेनला पूर्ण पाठिंबा आहे व आमच्या बलाढ्य लष्कराची त्यांना पूर्ण कल्पना असल्याने ते अशी कृती करू शकणार नाहीत, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. गुरुवारी होऊ घातलेल्या चर्चेवर आमचे लक्ष आहे. या प्रश्नी रशियाला खरोखरच काही करण्याची इच्छा आहे का, हे त्यातून स्पष्ट होईल. त्यानंतर आणखी निर्बंध लादण्यावर विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

जिनेव्हामध्ये बैठक
युक्रेनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका, रशिया, युरोपियन संघटना आणि युक्रेन यांच्यात गुरुवारी वाटाघाटीला सुरुवात झाली आहे. अमेरिकेकडून परराष्ट्र मंत्री जॉन केरी आणि त्यांचे रशियन समपदस्थ सेर्जिई लाव्हरोव्ह सहभागी झाले आहेत.

लष्करी कारवाई, 3 ठार
पूर्वेकडील प्रांतातील तळावर युक्रेनने केलेल्या हवाई हल्ल्यात 3 जण ठार झाले. मृतांमध्ये रशियन समर्थक फुटीरतावाद्यांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. मारिऊपोल भागात हा हल्ला करण्यात आला. अ‍ॅझोव्ह सागर किनार्‍यावर हे रशियन समर्थक लष्करी तळ आहे. हल्ल्यात 13 जण जखमी झाले तर 63 जणांना युक्रेनच्या सुरक्षा यंत्रणेने ताब्यात घेतले.