आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • US Asks India, Pakistan To Contribute To Stability In South Asia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-पाकिस्तान संबंधात मध्यस्थीस अमेरिकेचा नकार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - भारत-पाकिस्तान यांच्यातील वाद संपुष्टात आणण्यासाठी आपण अजिबात मध्यस्थी करणार नाही, असे बुधवारी अमेरिकेने स्पष्ट केले. दोन्ही देशांतील संघर्ष थांबवण्यासाठी विशेष दूताची नेमणूक करण्याचा दावा फेटाळून लावतानाच आपल्या काश्मीर धोरणात काहीही बदल झाला नसल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले.

पाकिस्तानी लष्कराकडून नियंत्रण रेषेवर करण्यात आलेल्या गोळीबाराच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने ही प्रतिक्रिया दिली आहे. उभय देशांतील चर्चेची प्रक्रिया नव्याने सुरू व्हावी. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत; परंतु त्यासाठी विशेष दूताच्या नेमणुकीचा प्रश्नच निर्माण होत नाही. आमचे राजदूत यासंदर्भात पुरेसे काम करू लागले आहेत. त्यामुळे विशेष दूताची गरज वाटत नाही, असे परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मॅरी हार्फ यांनी सांगितले. आखाती देशातील शांतता प्रक्रियेसाठी विशेष दूताची नेमणूक करण्यात आली होती. त्या धर्तीवर भारत-पाकिस्तान यांच्यातील काश्मीर मुद्दय़ावर विशेष दूताची नेमणूक करणार का, या प्रश्नावर त्यांनी हे स्पष्टीकरण दिले.

मध्य आशियावर भारत-चीन चर्चा
मध्य आशियाच्या मुद्दय़ावर भारत-चीन यांच्यात पहिल्यांदाच चर्चा आयोजित करण्यात आली होती. त्यात दहशतवादाचे उच्चटन, ऊर्जा सुरक्षा या मुद्दय़ांवर चर्चा होणे अपेक्षित आहे. दोन्ही देशांतील चर्चेचा मंगळवारी समारोप झाला. आशियाला केंद्रस्थानी ठेवून दोन्ही देशांत पहिल्यांदाच संवाद घडून आला आहे. अफगाणिस्तानातील दहशतवादाचा मुद्दाही चर्चेत होता. अमेरिकेचे लष्कर पुढील वर्षी अफगाणमधून माघारी जाणार आहे. त्याचबरोबर अल-कायदाचा मुद्दाही चर्चेत होता.

शांतता चर्चेसाठी प्रोत्साहन
सरहद्दीवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे आम्हाला अधिक चिंता वाटू लागली आहे. आम्ही दोन्ही देशांना प्रोत्साहन देण्याचे काम करत आहोत. उभय देश परस्परांच्या संपर्कात आहेत, याचीही आम्हाला जाणीव आहे; परंतु त्यांनी चर्चेसाठी पुढाकार घ्यावा, असे हार्फ यांनी म्हटले आहे.

काश्मीर धोरणात बदल नाही
सीमेवर गोळीबार झाला असला तरी काश्मीर धोरणात काहीही बदल झालेला नाही. दोन्ही देशांनी सामोपचाराने चर्चा करावी. त्यातून या मुद्दय़ावर तोडगा काढावा. योग्य वेळी आम्ही या घडामोडींमध्ये लक्ष घालू, असे अमेरिकेने स्पष्ट केल्याने पाकिस्तानचा मुखभंग झाला आहे.