न्यूयॉर्क - अमेरिकेच्या एका कोर्टाने पंतप्रधान
नरेंद्र मोदींना मोठा दिलासा दिला आहे. 2002 मध्ये गुजरातमध्ये झालेल्या दंगली थांबवण्यात अपयश आल्याचा आरोप करणारी त्यांच्याविरुद्धची याचिका फेटाळण्यात आली आहे.
अमेरिकन जस्टीस सेंटर या मानवाधिकार संघटनेने ही याचिका दाखल केली होती. मोदींच्या निमंत्रणावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यापूर्वी हा निर्णय आला आहे, हे विशेष.
न्यायमूर्ती अॅनालिसा टोरेस म्हणाल्या की, कोणत्याही देशाच्या प्रमुखाविरोधात खटला चालवला जाऊ शकत नाही. याचिकेत मोदींवर तीन गंभीर आरोप लावण्यात आले होते. पण कोर्टाने हे तिन्ही आरोप फेटाळले आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात मोदी अमेरिका दौ-यावर जाण्यापूर्वी न्यूयॉर्कच्या एका न्यायालयाने मोदींच्या विरोधात समन्स काढले होते. तसेच त्यांला उत्तर देण्यासही सांगण्यात आले होते. मोदी हे भारताचे प्रमुख आहेत, त्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रालय त्यांना सर्व खटल्यांपासून दूर ठेवत असल्याचे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यावेळी म्हटले होते. त्यालाच आधार मानून न्यूयॉर्कच्या न्यायालयाने याचिका फेटाळली आहे.