आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • US Includes Jamaat Ud Dawa In List Of Terror Outfits

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमेरिकेचा दणका : हाफिज सईदची एनजीओ अतिरेक्यांना पोसणारीच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वॉशिंग्टन/ इस्लामाबाद/ दिल्ली - अमेरिकेने पाकिस्तानला मोठा झटका दिला आहे. पाकिस्तान ज्या जमात-उद-दावाला कल्याणकारी संस्था मानते त्यावर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत. जमात-उद-दावा आणि त्याचा म्होरक्या हाफिज सईद वास्तवात अतिरेक्यांचेच ‘कल्याण’ करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबावर फास आवळत ही कारवाई करण्यात आली आहे. जमात-उद-दावा लष्करचीच मूळ संघटना मानली जाते. अमेरिकेने लष्करसह त्याच्याशी संबंधित संघटनांना प्रतिबंधित संघटनांच्या यादीत टाकले आहे. याबरोबर पाकिस्तानमध्ये राहणारे लष्करचे दोन वित्त पुरवठादार नजीर अहमद चौधरी आणि मुहंमद हुसैन गिल यांच्यावर आर्थिक निर्बंध लादले आहेत. गिलने दहा वष्रे लष्करचा अकाउंटंट आणि मुख्य वित्त अधिकारी म्हणून काम केले आहे. याव्यतिरिक्त लष्करशी संबंधित आणखी 22 जणांना दहशतवादी जाहीर करण्यात आले आहे. अमेरिकेत त्यांचे बँक खाते गोठवण्यात आले आहे. अमेरिकेने हाफिज सईदला याआधीच अतिरेकी घोषित केले आहे.

लष्कर मुंबई हल्ल्याचा मास्टर माइंड
लष्कर-ए-तोयबा संघटना मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याची मास्टर माइंड होती. हल्ल्यात 166 नागरिक ठार झाले होते.

जमात-उद-दावाचा म्होरक्याचा पाकिस्तानात मुक्त संचार
जमात-उद-दावाचा म्होरक्या हाफिज सईदचा पाकिस्तानमध्ये मुक्त संचार आहे. तो भारताविरुद्ध विखारी प्रचार करतो. नवाझ शरीफ यांनी नुकत्याच केलेल्या भारत दौर्‍याचा त्याने विरोध केला होता.
लष्करशी संबंधित या संघटनांवर बंदी
जमात-उद-दावा, अन् अनफाल ट्रस्ट, तहरिक-ए- मुहरमत-ए- रसूल, तहरिक-ए-तहहुज, कबिला अव्वल. लष्कर-ए-तोयबा या नावांच्या आडून हदशतवादी कारवाया करत आहेत.
संयुक्त राष्ट्राचे ‘जमात’वर शिक्कामोर्तब
संयुक्त राष्ट्राने 2008 मध्ये जमात-उद-दावाला लष्करशी संबंधित दहशतवादी संघटना मानले होते. याबरोबर त्याच्यावर कारवाईचीही शिफारस करण्यात आली होती.
भारतीय वकिलातीवरील हल्ल्यामागे तोयबाच
अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतातील भारतीय वकिलातीवरील हल्ल्यामागे पाकिस्तानातील लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा हात आहे. त्याचा सबळ पुरावा असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे.
हेरातमधील भारतीय वकिलातीवर 23 मे 2014 रोजी घडवण्यात आलेल्या हल्ल्यामागे लष्कर-ए-तोयबाचाच हात असल्याचा विश्वासार्ह पुरावा आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मेरी हर्फ यांनी गुरुवारी सांगितले. या दहशतवादी संघटनेवरील निर्बंध अमेरिकेने अधिक कडक केले आहेत.

या खात्रीलायक पुराव्याचा तपशील देण्यास मात्र हर्फ यांनी नकार दिला. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेण्याच्या तीन दिवस अगोदर हा हल्ला करण्यात आला होता. मोदी यांच्या सार्कसंदर्भातील सकारात्मक धोरणामध्ये अडचणी निर्माण करण्याचा उद्देश या हल्ल्यामागे होता.