आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका नरमली; तामिळ अत्याचाराबद्दल आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी सोडली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- श्रीलंकेतील तामिळ अत्याचाराच्या विरोधातील अमेरिकेच्या प्रस्तावामध्ये नरमाई आली आहे. मानवी हक्कांसंदर्भात श्रीलंकेने स्वतंत्र आणि विश्वासार्ह चौकशी करावी, असे आवाहन नव्या प्रस्तावात करण्यात आले आहे.

जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क परिषदेची दोन दिवसीय बैठक होत असून या बैठकीत एकूण 40 प्रस्ताव आहेत. त्यापैकी पहिलाच प्रस्ताव श्रीलंकेसंबंधातील आहे. सन 2009 मधील तामिळ संघटना लिट्टे विरोधातील युध्दात श्रीलंका सरकारने तामिळ नागरिकांवरील केलेल्या अत्याचाराच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क उच्चायुक्तालयाने आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या मागणीला अमेरिकेच्या प्रस्तावामध्ये स्थान देण्यात आले नसून श्रीलंका सरकारनेच स्वतंत्र चौकशी करावी असा उल्लेख नव्या मसुद्यात करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सप्टेंबर 2013 मध्ये उत्तर प्रांतात प्रांतिक निवडणुका घेण्याच्या श्रीलंकन सरकारच्या घोषणेचेही अमेरिकेने स्वागत केले आहे.

भारताचा प्रभाव : अमेरिकेच्या प्रस्तावात नरमाई येण्यामागे भारताचा प्रभाव असल्याचे मानले जाते. तामिळी अत्याचाराच्या मुद्द्यावर द्रमुकसह तामिळी पक्ष आक्रमक झाले असताना श्रीलंकेसोबतचे संबंधही बिघडू नयेत, अशी कसरत भारत सरकारला करावी लागणार आहे. परिणामी श्रीलंकेविरु द्धच्या अमेरिकी मसुद्यातील भाषा सौम्य करण्यामागे भारताची कूटनीती कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

पूर्वीचा प्रस्ताव- तामिळ प्रांतात सत्तेचे हस्तांतर करण्यात श्रीलंका सरकारला अपयश आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे सन 2009 च्या तामिळींवरील अत्याचारांबद्दल ‘युद्ध गुन्हेगार’म्हणून खटला चालवण्यात यावा, असा प्रस्ताव होता.

श्रीलंकेने प्रस्ताव फेटाळला- कोलंबो- जिनिव्हातील बैठकीत सादर होणारा अमेरिकेचा प्रस्ताव श्रीलंकेने फेटाळला आहे. कथित मानवी हक्क भंगावरून श्रीलंकेची बदनामी आणि जाणूनबुजून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप परराष्ट्र मंत्री जी. एल. पेरिस यांनी केला आहे. श्रीलंकेने सर्व सदस्य देशांना पत्र पाठवले आहे. गेल्या ठरावाप्रमाणेच यंदाचाही प्रस्ताव श्रीलंका फेटाळत असल्याचे त्यात म्हटले आहे. गतवर्षी भारताच्या पाठिंबा मिळालेला अमेरिकेचा प्रस्तावही श्रीलंकेने फेटाळला होता.